मंत्री खाडेंच्या सत्कार कार्यक्रमात रंगली जुगलबंदी

संतोष भिसे
शुक्रवार, 5 जुलै 2019

 गेल्या पाच वर्षांत आमदार सुरेश खाडे यांनी पक्षांतर्गत आणि बाहेरच्या विरोधकांना थंड करण्यात यश मिळवले. मंत्रीपद मिळाल्यानंतर उरलेसुरले विरोधकही संपले. तरीही पंचायत समितीतील काॅग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे आणि सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी खाडे यांना विरोधाचा झेंडा कायम ठेवला आहे. पंचायतीत आज झालेल्या सत्कार कार्यक्रमात खाडे, आमटवणे आणि पाटील यांच्यातील जुगलबंदी तालुक्याने अनुभवली.

मिरज - गेल्या पाच वर्षांत आमदार सुरेश खाडे यांनी पक्षांतर्गत आणि बाहेरच्या विरोधकांना थंड करण्यात यश मिळवले. मंत्रीपद मिळाल्यानंतर उरलेसुरले विरोधकही संपले. तरीही पंचायत समितीतील काॅग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे आणि सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी खाडे यांना विरोधाचा झेंडा कायम ठेवला आहे. पंचायतीत आज झालेल्या सत्कार कार्यक्रमात खाडे, आमटवणे आणि पाटील यांच्यातील जुगलबंदी तालुक्याने अनुभवली.

तानाजी पाटील आणि खाडे यांच्यातील राजकीय संघर्ष पोलिसात आणि न्यायालयापर्यंत गेला आहे. तानाजी पाटील यांच्यावर पोलिस कारवाईची मागणी खाडे यांनी थेट विधीमंडळात केली होती.  तरीही आजच्या सत्कार कार्यक्रमाला श्री. पाटील पहिल्या रांगेत उपस्थित होते.

खाडे यांच्यावर गैारवाचे भाषणही त्यांनी कले. श्री. पाटील म्हणाले, खाडे यांच्या रुपाने मिरज मतदारसंघाला साठ वर्षांत पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले आहे, त्यामुळे आमच्यासारखे विरोधकही खुश आहेत. भाऊंनी आमदार म्हणून आजवर चांगले काम केले आहे, मंत्रीपद मिळाल्याने आता यापेक्षाही चांगले काम होईल. पंचायत समितीच्या सभागृहाने आजवर अनेक नेत्यांना उर्जा देऊन राज्यस्तरावर कामगिरीची ताकद दिली आहे. खाडेंनाही ती मिळेल. त्यांच्या कामाला मंत्रीपदामुळे धार आली आहे. आतापर्यंत आम्ही त्यांच्याशी मुद्द्याने भांडलो, पण गुद्द्यावर आलो नाही. मुद्द्याचे भंडण भविष्यातही सुरुच राहील. 

यावर मंत्री खाडे म्हणाले, आमच्या दोघांच्याही मनात वैयक्तीक आकस नाही. चांगला विरोधक असलाच पाहीजे, त्यासाठी श्री. पाटील आणि आमटवणेंचा सत्कार केला पाहीजे.

खाडे आणि आमटवणे यांच्यातील राजकीय संघर्ष संपुर्ण तालुक्याला माहीत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतेवेळी खाडेंनी आमटवणेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला. खांद्यावर हात ठेवून म्हणाले, दादा, तुमचे घोडे जरा रोखून धरा. सोबत या. यावर आमटवणे यांनीही हसून दाद दिली. घोडे थांबणार नाहीत असे सुचित केले. कार्यक्रमानंतर ते म्हणाले, कॉंग्रेस आमच्या रक्तात आहे. खाडेंना विकासकामांसाठी राजकीय विरोध सुरुच राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Suresh Khade, Tanaji Patil, Anil Amtavne political comments