अर्ध्या महाराष्ट्राला नाचवतात मिरजेतील ढोल

संतोष भिसे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मिरज - गणेशोत्सवाच्या तोंडावर सतारमेकर गल्लीत लगीनघाई सुरू आहे. निम्म्या महाराष्ट्रात उत्सवासाठी तालवाद्ये मिरजेतून जातात. कोकणपट्ट्यातील घराघरांत सतारमेकर यांनी वाद्ये पुरवली आहेत. गोवा, कर्नाटकातूनही मोठी मागणी आहे.  

मिरज - गणेशोत्सवाच्या तोंडावर सतारमेकर गल्लीत लगीनघाई सुरू आहे. निम्म्या महाराष्ट्रात उत्सवासाठी तालवाद्ये मिरजेतून जातात. कोकणपट्ट्यातील घराघरांत सतारमेकर यांनी वाद्ये पुरवली आहेत. गोवा, कर्नाटकातूनही मोठी मागणी आहे.  

तीन-चारशे वर्षांची तंतुवाद्यनिर्मितीची परंपरा असलेल्या संगीतनगरी मिरजेत राज्यभरातून ग्राहक गर्दी करतात. विशेषतः श्रावण सुरू झाला, की सतारमेकर कुटुंबाला कारखान्यातून बाहेरही पडता येत नाही. गणेशोत्सवासाठी वाद्यांची मागणी जून-जुलैपासून सुरू होते. पुण्यानंतर मिरजेतच घाऊक खरेदी-विक्री होते. कोकण, पंढरपूर, विदर्भ-मराठवाडा, कर्नाटकसह अर्ध्या महाराष्ट्रात वाद्ये जातात. शंभरहून अधिक कारखाने आहेत. हल्ली डॉल्बीवर पोलिसांनी वक्रदृष्टी वळवल्याने मंडळांनी झांज, ढोलपथकांना पसंती दिली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याचे व्यावसायिक संजय मिरजकर म्हणाले. 

लखनौ, मेरठ व दिल्ली येथून कच्चा माल येतो. जोडणी करून विक्री होते. सतार, तंबोरा, वीणा अशा तंतुवाद्यांच्या निर्मितीत हातोटी असलेले कारागीर काळानुरूप तालवाद्यांच्या निर्मितीतही उतरले. ढोल,  ताशे, मृदुंग, तबला, नगारा, डग्गा यांची निर्मिती होते. वीस टक्‍क्‍यांपर्यंत स्वस्त वाद्ये मिळत असल्याने मंडळे दूरवरून येतात. कोकणपट्टयात होळीपासून वाद्यांसाठी मागणी, नोंदणी व खरेदी सुरू होते.

शिमगोत्सवासाठी दमडी अक्षरशः हजारोंच्या संख्येने मिरजेतून पुरवली  जाते. सध्या गणेशोत्सवाची लगबग सतारमेकर गल्लीत सुरू आहे. अनंतचतुर्दशीपर्यंत सतारमेकरांना फुरसत असणार नाही.

मिरज ब्रॅंड लोकप्रिय
‘सतारमेकर कुटुंबीयांनी सचोटीने व्यवसाय जपला आहे. निर्मिती, विक्रीपासून दुरुस्तीपर्यंत सर्व सेवा एकाच  गल्लीत मिळतात. त्याची हमीही ग्राहकांना आहे. गुणवत्ता राखल्याने मिरजेतील वाद्ये वर्षानुवर्षे टिकतात. यंदा लाकडी वाद्यांना अठरा टक्के व स्टील वाद्यांना बारा टक्के जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे किमती किंचित वाढल्या आहेत. तरीही मिरजेची बाजारपेठ तुलनेने स्वस्तच आहे. स्वस्त मजुरी, स्वस्त पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या सोयी यामुळे स्वस्त दरात वाद्ये देणे शक्‍य होते, असे व्यावसायिक संजय मिरजकर यांनी सांगितले. 

हरेक प्रकारची वाद्ये मिरजेत मिळतात. त्याची हमी असल्याने गदगहून आलो. लाकडी पोट असलेल्या धनगरी ढोलांची मागणी नोंदवली आहे. आठवडाभरात ते मिळतील. अनेक वर्षे मिरजेतूनच ढोल, टाळ आदी वाद्ये नेतो.   
- सदाशिव खिलारे, 

गदग (कर्नाटक)

Web Title: Miraj Bass Drum special