मिरज, वाळवा, जतचे 31 गट निर्णायक 

विष्णू मोहिते- सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

सांगली - मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविण्यासाठी सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या मिरज, वाळवा आणि जत तालुक्‍यातील लढतीवर नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. झेडपीच्या 60 पैकी तीन तालुक्‍यांतून 31 सदस्य, तर अन्य सात तालुक्‍यांतून 29 सदस्य निवडून येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, कॉंग्रेसचे नेते पतंगराव कदम, जयश्री पाटील, विशाल पाटील, अजितराव घोरपडे, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप, नाना महाडिक, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सांगली - मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविण्यासाठी सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या मिरज, वाळवा आणि जत तालुक्‍यातील लढतीवर नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. झेडपीच्या 60 पैकी तीन तालुक्‍यांतून 31 सदस्य, तर अन्य सात तालुक्‍यांतून 29 सदस्य निवडून येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, कॉंग्रेसचे नेते पतंगराव कदम, जयश्री पाटील, विशाल पाटील, अजितराव घोरपडे, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप, नाना महाडिक, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आरोप-प्रत्यारोपाने निवडणुकीतील वातावरण ढवळून निघाले आहे. 

जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात अनेक नाट्यमय घडामोडी सुरूच राहणार आहेत. मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवण्यासाठी सर्वाधिक जागा असलेल्या तालुक्‍यांवर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रचाराची सांगता रविवारी (ता. 19) रात्री दहा वाजता होणार आहे. मतदान मंगळवारी (ता. 21) व मतमोजणी गुरुवारी (ता. 23) होणार आहे. 

मिरज व वाळवा तालुक्‍यात झेडपीचे प्रत्येकी 11 गट आणि जत तालुक्‍यात 9 गट आहेत. बहुमताच्या जादूचा आकडा गाठण्यासाठी तीन तालुक्‍यातील लढतींवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेने वाळव्यातील एक आणि मिरज तालुक्‍यातील एका जागेवर ताकद पणाला लावली आहे. 

मिरज तालुक्‍यात झेडपीचे अकरा गट आहेत. गेल्या वेळी येथे 10 पैकी 7 जागांवर कॉंग्रेस, तर तीन जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आले होते. यंदाच्या जागा वाटपात मिरज तालुक्‍यात उमेदवारीवरून मदनभाऊ आणि विशाल पाटील गटातील वाद माघारीवेळी संपला. कॉंग्रेसने मालगाव, आरगमध्ये आघाडीचा फॉर्म्युला स्वीकारला. कॉंग्रेसने खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी आघाडीला दोन जागा देण्यात आल्या. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग गटात कॉंग्रेसने अजितराव घोरपडेंसोबत आघाडी केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि घोरपडे गटाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. म्हैसाळ गट राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे. भाजपने बुधगाव, कवलापूर, भोसे, मालगाव गट प्रतिष्ठेचे केले आहेत. त्यात कवलापूर, बुधगाव गटात डोंगरे दापत्यांना उमेदवारींने कार्यकर्ते अन्‌ मतदारांतही गोंधळाची स्थिती आहे. 

वाळवा तालुक्‍यातील सर्व म्हणजे 11 गटात राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादी विरोधात रयत विकास आघाडीतून कॉंग्रेसने स्वतंत्रपणे तीन जागा लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीसाठी पोषण ठरू शकेल. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचा मुलगा सचिन बागणीतून लढतो आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या मुलगा वैभव यांच्याशी त्यांची कडवी झुंज आहे. याच गटात राष्ट्रवादीचे संभाजी कचरे यांची बंडखोरी राष्ट्रवादीच्या चिंतेत भर घालणारी आहे. 

जत तालुक्‍यात भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीत अशी तिरंगी लढत होत आहे. प्रमुख लढत भाजप आणि कॉंग्रेसमध्येच आहेत. राष्ट्रवादीबरोबर सुरेश शिंदे यांच्या वसंतदादा स्वाभिमानीने आघाडी केली आहे. जनसुराज्यने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. संख गट आणि दोन गण जनसुराज्यला दिलेत. आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे झेडपीच्या जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्या जात आहेत. उमदीत कॉंग्रेसचे विक्रम सावंत व राष्ट्रवादीचे चन्नाप्पा होर्तीकर यांच्यात काट्याची लढत आहे.

Web Title: miraj jat