महापालिकेत पुन्हा कॉंग्रेसच सत्तेवर येईल - किशोर जामदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मिरज - महापालिकेसाठी सध्या नव्याने केलेली प्रभागरचना विकासाला मारक असल्याची टीका गटनेते किशोर जामदार यांनी केली. भाजपने कितीही शड्डू ठोकला तरी महापालिकेत पुन्हा कॉंग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

मिरज - महापालिकेसाठी सध्या नव्याने केलेली प्रभागरचना विकासाला मारक असल्याची टीका गटनेते किशोर जामदार यांनी केली. भाजपने कितीही शड्डू ठोकला तरी महापालिकेत पुन्हा कॉंग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

पत्रकार बैठकीत ते बोलत होते. कॉंग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वहीदा नायकवडी, प्रा. सिद्धार्थ जाधव यावेळी उपस्थित होते. श्री. जामदार म्हणाले,""कार्यक्षम असणाऱ्या नगरसेवकांनाच नव्या प्रभागरचनेचा फायदा होईल. निवडणुकीच्या प्रचाराची पदयात्रा काढायची म्हटले तरी नव्या रचनेत ते शक्‍य नाही. 2003 मध्ये अशीच प्रभागरचना झाली होती; पण ती फोल ठरल्याचा जुना अनुभव आहे; तरीही पुन्हा अशीच रचना केली आहे; यामुळे विकासकामांवर मर्यादा येतील. संपूर्ण प्रभागाला न्याय देता येणार नाही.

तिकीटवाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या पश्‍चात सर्व नेत्यांचे सामुदायिक नेतृत्व निवडणुकीचा किल्ला लढवेल. फळी विस्कटणार नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत आणि वर्षभरापूर्वीच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या चुका यावेळी टाळण्याचा प्रयत्न आहे. काहीजण अन्य पक्षांच्या संपर्कात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्याय तयार ठेवले आहेत. जातीची व अन्य समीकरणे पाहून उमेदवार निश्‍चित करावे लागतील.'' 

नव्वद टक्के विकासकामे झाल्याचा दावा
श्री. जामदार यांनी दावा केला की, गेल्या पाच वर्षांत महापालिका क्षेत्रात नव्वद टक्के विकासकामे झाली आहेत. नियोजन मंडळातून मिळालेला शासकीय निधी आणि महापालिकेचा स्वतःचा निधी यातून रस्त्यांची कामे झाली. भाजी मंडईला जागा नसल्याने काम अडले आहे. शास्त्री चौक ते बसस्थानक हा रस्ता सार्वजनिक बांधकामकडे असल्याने रखडला आहे. 

मिरज पॅटर्नची बदनामी नको 
महापालिकेत मिरज पॅटर्न म्हणून सातत्याने हिणवले जाते; मात्र आमच्यादृष्टीने असा कोणताही पॅटर्न अस्तित्वात नाही. विकासाच्या कामासाठी मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येतात आणि कामे तडीस नेतात; यालाच आम्ही मिरज पॅटर्न म्हणतो असे स्पष्टीकरण जामदार यांनी केले.

Web Title: miraj news municipal congress politics kishor jamdar