मिरजेलगत प्‍लॉटिंग जोमात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

मिरज - शहराला खेटून असणाऱ्या गावांमधील जमिनींच्या किमती सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर चालल्या आहेत. सोन्याच्या दरापेक्षाही अधिक वेगाने किमती वाढत आहेत. सांगली-मिरजेतील धनिकांचे गुंतवणुकीला प्राधान्य आणि नोकरदारांची राहण्यासाठी पसंती यामुळे गुंठ्याचे दर लाखांच्या पटीत उड्डाणे घेत आहेत.  

मिरज - शहराला खेटून असणाऱ्या गावांमधील जमिनींच्या किमती सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर चालल्या आहेत. सोन्याच्या दरापेक्षाही अधिक वेगाने किमती वाढत आहेत. सांगली-मिरजेतील धनिकांचे गुंतवणुकीला प्राधान्य आणि नोकरदारांची राहण्यासाठी पसंती यामुळे गुंठ्याचे दर लाखांच्या पटीत उड्डाणे घेत आहेत.  

मिरजेचा विस्तार चारही दिशांनी होत आहे. शहराच्या विस्ताराला मर्यादा आहेत. रहिवासी वसाहती शहराबाहेर वाढू लागल्या आहेत. सुभाषनगर, टाकळी, म्हैसाळ, बेडग, बोलवाड, वड्डी, मालगाव, आरग, ढवळी, माधवनगर बायपास रस्ता, निलजी रस्ता येथे जमिनींचे निवासी स्वरूपात रूपांतर वेगाने होत आहे. अनेक एकर क्षेत्र प्लॉटमध्ये रूपांतरित होत आहे. रंगीबेरंगी खांब लावून आरक्षित केलेले प्लॉट गावोगावी दिसून येत आहेत. मिरजेत राहणे महागडे आणि आरोग्यासाठी सुरक्षित राहिले नसल्याचा अनुभव येत आहे. परिणामी, नोकरदार मंडळी शहरालगतच्या गावांना पसंती देत आहेत. विशेषतः मालगाव, म्हैसाळ, टाकळी, सुभाषनगर येथे परगावच्या रहिवाशांची संख्या वाढत आहे. 

किमती आवाक्‍याबाहेर
निवासी कारणांपेक्षा गुंतवणूक म्हणून स्थावराचा अधिक विचार होऊ लागला आहे. त्यामुळे जमिनींच्या किमती सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या आहेत. पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाट्याजवळ बिगरशेती प्रतिगुंठ्याचा दर सात ते दहा लाखांपर्यंत गेला आहे. शहरातील व्यावसायिकांनी गुदामांसाठी गुंतवणूक केल्याने जमिनीच्या दराची स्पर्धा जोरात सुरू आहे. मालगाव रस्त्यावर सुभाषनगरपर्यंत प्रतिगुंठ्याचा दर सरासरी सात ते दहा लाख रुपये आहे. पुढे पाण्याच्या टाकीपर्यंत तो पाच ते सात लाखांपर्यंत खाली येतो.

नोकरदारांची पसंती सुभाषनगरला असली, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे; ती जमिनींच्या किमतींना मारक ठरली आहे. टाकळी रस्त्यावरही जमिनींच्या किमती याच स्तरावर आहेत. सावळी रस्त्यावर निवासी कारणासाठी प्लॉट मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यांच्या किमती प्रतिगुंठा दहा लाखांपर्यंत गेल्या आहेत. माधवनगर बायपास रस्त्यावर निवासी संकुले अद्याप दिसत नसली, तरी तेथील प्लॉट सहा ते आठ लाखांपर्यंत गेले आहेत. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या निलजी रस्त्यावरही घरांची बांधकामे गर्दी करू लागली आहेत. 

बेडग, म्हैसाळ रस्त्यांवर सात ते नऊ लाख, बोलवाड रस्त्यावर आठ ते दहा लाख अशा किमतींमुळे जमिनींचे तुकडे सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत. नोटाबंदीने मंदावलेले व्यवहार पुन्हा गती घेऊ लागले आहेत. 

फसवणूक वाढली
गुंठेवारीच्या नोंदी होत नसल्याने नोटरीद्वारे व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून एकच प्लॉट अनेकांना विकल्याची गुन्हेगारी प्रकरणेही उघडकीस येत आहेत. ग्रामपंचायतीत आठ ‘अ’चा उतारा काढून त्याद्वारे मालकी शाबूत करण्याचा ग्राहकांचा प्रयत्न सुरू आहे. घरांचे गरजू ग्राहक ‘नोटरी’च्या भरवशावर जमिनींचा ताबा घेऊन बांधकामे करीत आहेत. 

Web Title: miraj news plotting increase in miraj