तब्बल सहा किलोची किडनी शस्त्रक्रियेने काढली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मिरज - सहा किलो 24 ग्रॅम वजनाची किडनी (मूत्रपिंड) काढून टाकण्याची शस्त्रक्रिया वॉन्लेस इस्पितळामध्ये यशस्वीपणे करण्यात आली. कऱ्हाडच्या पन्नास वर्षीय रुग्णावर ती झाली. उपलब्ध माहितीनुसार ही किडनी जगातील सर्वाधिक वजनाची ठरली आहे. या कामगिरीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे "वॉन्लेस'चे संचालक डॉ. नॅथानियल ससे यांनी सांगितले. 

मानवी शरीरातील किडनीचे वजन सामान्यतः दीडशे ग्रॅम असते. हे पाहता वॉन्लेसमध्ये शस्त्रक्रियने काढलेली किडनी "अवाढव्य' म्हणावी अशीच. सामान्य किडनीपेक्षा तब्बल चाळीसपट ती मोठी होती. हा रुग्ण आठ-दहा वर्षांपासून त्रस्त होता. दोन महिन्यांत विकार बळावला. त्यामुळे वॉन्लेसमध्ये धाव घेतली. तपासणीत ही आकाराने मोठी किडनी दिसली. तिच्यात पाण्याचे फुगे तयार झाले होते. पाणी वाढेल तशी ती फुगत होती. निकामी बनली होती. शस्त्रक्रिया जोखमीची होती. मात्र रुग्णाने तयारी दर्शवली. 

अखेर मागील आठवड्यात शस्त्रक्रिया झाली. वॉन्लेसमधील मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. राजीव गांधी, सांगलीतील मूत्ररोग शल्यविशारद डॉ. निकेत शहा, भुलतज्ज्ञ डॉ. सिद्धेश्‍वर शेटे यांनी ती यशस्वी केली. चार तास शस्त्रक्रिया चालली. फुगलेली किडनी काढली. तीन लिटर पाणीमिश्रित द्रवही काढला. रुग्णाची दुसरी किडनीही निकामी झाली आहे. कालांतराने तीदेखील काढून टाकावी लागेल. सध्या तो डायलेसीसवर आहे. 

डॉ. ससे म्हणाले,""हजारात एकाला असा विकार होतो. वैद्यकीय परिभाषेत त्याला ऍडल्ट पॉलिसिस्टीक म्हंटले जाते. तो अनुवांशिकदेखील असतो. फुगलेल्या किडनीने पोटाचा सत्तर ते ऐंशी टक्के भाग व्यापला होता. अन्य अवयव व आतड्यांना चिकटली होती. जगातील आजवरची माहिती पाहता ही किडनी सर्वाधिक वजनाची व आकाराने मोठी ठरली. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डनुसार सर्वाधिक वजनाची किडनी दोन किलो 75 ग्रॅम वजनाची नोंदली गेली आहे. अन्य एका उदाहरणात किडनीत कर्करोगाची गाठ झाल्याने तिचे वजन 5 किलो 18 ग्रॅमपर्यंत वाढल्याची नोंदही आहे. वॉन्लेसमध्ये शस्त्रक्रिया झालेली किडनी त्या सर्वांच्या तुलनेत खूपच "वजनदार' ठरली. 

Web Title: miraj news Removal of kidney surgery