तोडलेल्या झाडांना नवसंजीवनी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मिरज - मिरज-सांगली रस्त्याच्या सहा पदरीकरणात बळी पडलेल्या काही वटवृक्षांना नवजीवन देण्याची धडपड वृक्षप्रेमींनी सुरू ठेवली आहे. रुंदीकरणासाठी ६६ झाडे तोडण्यात आली; त्यातील सात झाडांचो पुनर्रोपण करण्यात येणार आहे. 

मिरज - मिरज-सांगली रस्त्याच्या सहा पदरीकरणात बळी पडलेल्या काही वटवृक्षांना नवजीवन देण्याची धडपड वृक्षप्रेमींनी सुरू ठेवली आहे. रुंदीकरणासाठी ६६ झाडे तोडण्यात आली; त्यातील सात झाडांचो पुनर्रोपण करण्यात येणार आहे. 

यातील पहिले पुनर्रोपण काल पूर्ण झाले. शुक्रवारपर्यंत आणखी दोन झाडांचे पुनर्रोपण होईल. रोटरी क्‍लब, आयएमए, अंबाबाई संस्था, कन्या महाविद्यालय आणि महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रस्त्याच्या कामासाठी विविध प्रकारची झाडे तोडण्यात आली असली तरी पुनर्रोपणासाठी फक्त वटवृक्षांनाच प्राधान्य दिले आहे. ती जगण्याची शक्‍यता जास्त आहे; शिवाय त्यावर जैवविविधताही फुलत असल्याने ती पर्यावरणानुकूल ठरतात. काल सतरा फूट लांबीचे खोड वंटमुरे कॉर्नर परिसरात लावण्यात आले. क्रेनच्या मदतीने उचलून व ट्रॅक्‍टरच्या मदतीने वाहतूक करून जागेवर नेण्यात आले. काही टन वजनाचे खोड भर वाहतुकीच्या रस्त्यातून वाहून नेणे ही कसरत होती; ती यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. 

उर्वरित झाडांची खोडे वीस फुटांहून जास्त लांबीची आहेत; त्यामुळे त्यासाठी मोठी यंत्रणा वापरणार असल्याची माहिती सुधीर गोरे, सुबोध गोरे यांनी दिली. तीन झाडे वंटमुरे कॉर्नर येथे महापालिकेच्या खुल्या  जागेत लावण्यात येतील. उर्वरित झाडांसाठी जागेचा शोध सुरू आहे. काल पुनर्रोपण केलेली झाडे जगवण्याची हमी डॉ. अजय चौथाई व डॉ. ब्याकुडी यांनी दिली आहे. या उपक्रमासाठी महापालिकेचे उद्यान अधिकारी एम. बी. कोरे, रोटरी क्‍लबचे व्ही. डी. गोखले, मारुती नाईक, प्रा. राजू झाडबुके, विशाल गोसावी आदी परिश्रम घेत आहेत.

जुना अनुभव चांगला नाही
मिरज-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी काही वर्षांपूर्वी झाडे तोडण्यात आली होती. त्यातील बावीस झाडांचे पुनर्रोपण शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात करण्यात आले होते. त्यातील एकही झाड जगले नाही. सार्वजनिक बांधकाम व महापालिकेने पाण्याची व्यवस्था न केल्याने झाडांचा बळी गेला. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले.

Web Title: miraj news tree