मिरज-सलगरे रस्त्याला नऊ कोटींचा खड्डा

मिरज-सलगरे रस्त्याला नऊ कोटींचा खड्डा
मिरज-सलगरे रस्त्याला नऊ कोटींचा खड्डा

सांगली - मिरज पूर्व भागातील लोकांनी प्रचंड संघर्ष करून मिळवलेल्या मिरज-सलगरे रस्त्याला पहिल्या पावसातच मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच महिन्यांपूर्वी या नवीन रस्त्याची बांधणी झाली होती. त्याच्या दर्जाचा पंचनामा पावसाने केला असून टक्केवारीने बरबटलेल्या व्यवस्थेमुळे लोकांना पुन्हा एकदा खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार आहे. नऊ कोटी रुपयांचा खड्डा पडला असताना या भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचा एकही नेता या प्रकाराविरुद्ध आवाज उठवायला रस्त्यावर आलेला नाही, हे विशेष.

मिरज-सलगरे रस्त्यासाठी खूप वर्षे संघर्ष सुरू होता. गेली आठ ते दहा वर्षे रस्त्यावर प्रवास करणे जीवघेणे ठरत होते. अनेक मोठे अपघात झाले, काही जणांचा बळी गेला. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसजणांना जाग आली. त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. त्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून रस्ता मंजूर करून आणला. त्यासाठी तातडीने निधीही वर्ग झाला. त्यानंतर सुरू झाली ती टक्केवारीची चर्चा. नेत्यांपासून आंदोलक अभिनेत्यांपर्यंत साऱ्यांनी आपापला वाटा मागायला सुरवात केली. इतके वाटले तर आम्ही घ्यायचे काय अन्‌ काम कितीचे करायचे, अशी सहज भावना अनेक ठेकेदारांनी व्यक्त केली. टक्केवारीला पोसावलेल्या यंत्रणेला त्याचे सोयरसूतक नव्हते. त्यामुळे हातसाफ केलाच. त्यातूनही रस्त्याचे काम झाले, त्याची गुणवत्ता अवघ्या दोन महिन्यात उघडी पडली आहे. 

यंदा पावसाळा अधिक आहे, असे सांगून ठेकेदार हात झटकू शकतील, मात्र जिथे-जिथे खड्डे पडलेत त्याचा पंचनामा केला तरी डांबर पाण्यात विरघळते का, असा प्रश्‍न पडू शकतो. या साऱ्या अत्यंत गंभीर विषयावर या भागातील राजकीय नेते मूग गिळून गप्प आहेत. एकाही सरपंचाने, पंचायत समिती सदस्याने, जिल्हा परिषद सदस्याने या रस्त्याच्या दर्जाची चौकशी व्हावी, अशी मागणी केलेली नाही. 

आमदार खाडेंकडे चुकीची माहिती

आमदार सुरेश खाडे यांच्याशी संपर्क साधून या रस्त्याच्या अवस्थेविषयी लक्ष वेधले. त्यावर श्री. खाडे यांनी दिलेले उत्तर व त्यांच्याकडे उपलब्ध माहिती धक्कादायक आहे. ते म्हणाले, ‘‘या रस्त्याकडे माझे बारकाईने लक्ष आहे. त्यावर खड्डे पडले असले तरी अजून हॉट   मिक्‍सचा एक थर वरून येणार आहे. ते काम सुरू होण्याआधी पाऊस सुरू झाला. आता पावसाळा संपल्यानंतर काम होईल.’’ वास्तविक, या रस्त्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. कोणताही हॉटमिक्‍सचा थर त्यावर येणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आमदार खाडे यांच्याकडे चुकीची माहिती आहे की ठेकेदाराच्या बचावासाठी त्यांना कुणी ‘मिस गाईड’ करतेय?

हे आहेत ठेकेदार

मिरज-सलगरे रस्त्यासाठी ८ कोटी ९० लाख रुपये मंजूर होते. नव्या नियमानुसार ‘स्काडा’ पद्धतीने हा रस्ता व्हायला हवा होता. तो टाळण्यासाठी त्याचे तीन तुकडे पाडण्यात आले. डी. बी. गुंजाटे, सी. एम. नलवडे आणि आर. जी. गुणाणी या ठेकेदारांनी या रस्त्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी जुन्या रस्त्याचे डांबर, जुनी खडी तेथेच पसरण्यात आली आहे. जुने डांबर कुठे आहे दाखवा? असा सवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने केला तरी ठेकेदारांचे पितळ उघडे पडेल. अर्थात काही ठिकाणी डांबर बाजूला काढून त्याचे ढीग केले आहेत. त्याच ठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात अधिकारीही वाक्‌बगार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com