मिरज - काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपमधील फुटीरांच्या मदतीने उभारलेला डाव मोडीत काढत आज मिरज पंचायत समितीच्या सभापतिपदी अपक्ष शालन आनंदराव भोई यांची बिनविरोध निवड झाली. खासदार संजय पाटील यांनी तळ ठोकून या घडामोडींत सर्वपक्षीय हितसंबंधांची ताकद लावली. विशेष म्हणजे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक आनंदराव भोई यांच्या सौभाग्यवतींच्या मस्तकावर संजयकाकांनी सभापतिपदाचा मुकुट चढवला.
काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे दाखल केलेले उमेदवारी अर्ज खासदार पाटील यांच्या शिष्टाईनंतर माघार घेतले, मात्र तोवर पंचायत समितीच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शरद पाटील यांनी सौ. भोई यांची बिनविरोध निवड जाहीर केल्यानंतर साऱ्यांनी नि:श्वास सोडला. मिरज पूर्व भागासह एरंडोली पंचक्रोशीतून आलेल्या समर्थकांनी जल्लोष करत, गुलाल उधळत आनंद साजरा केला.
मिरज पंचायत समितीत भाजपची काठावरची सत्ता आहे. सभापती जनाबाई पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे या निवडीकडे लक्ष होते. सौ. भोई यांची निवड निश्चित मानली गेली होती. त्यांनी त्या अटीवरच भाजपमध्ये प्रवेश केला होता. खासदार संजय पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांनी हा मेळ जुळवून आणला होता, मात्र राजीनामा दिल्यानंतर नवे नाट्य सुरू झाले. मंगळवारपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली गतिमान झाल्याने सारे अस्वस्थ होते. भाजपच्या दोन सदस्यांचा पाठिंबा घेत सत्तेची जुळणी केली होती. त्यासाठी माजी सभापतींचीच उमेदवारी दाखल करण्याचेही ठरले होते.
खासदार पाटील यांच्या आदेशाची त्यांनी अट घातली होती. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांची अडचण झाली.
निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी खासदार पाटील यांनी मिरज पंचायत समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी उपसभापतिपदासाठी तुमच्या गटातील सदस्याचा विचार करू, असे सांगून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. तत्पूर्वी या निवडणुकीसाठी शालन भोई यांच्यासह सुवर्णा बाळासाहेब कोरे, पूनम महेश कोळी या दोघी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तिघींपैकी सुवर्णा कोरे आणि पूनम कोळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर तहसीलदार शरद पाटील यांनी शालन भोई यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
घोरपडे समर्थक ते भाजप सदस्य
सभापतिपदी निवड झालेल्या सौ. भोई या मिरज पूर्व भागात अनेक वर्षांपासून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या आनंदराव भोई यांच्या पत्नी आहेत. शालन भोई यांचे माहेर सांगली. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी याआधी काम केले आहे. आनंदराव भोई हे माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य आहेत. एरंडोलीला तालुका पातळीवरच्या राजकारणात पहिल्यांदाच मानाचे पान मिळाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.