
कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या बंदी आदेशास शहरात बेशिस्त नागरिक आणि व्यावसायिकांनी ठेंगा दाखवला आहे. शहरात वाढदिवस, विवाह सोहळ्यांसारखे कार्यक्रम राजरोसपणे रस्त्यांवर साजरे होत आहेत.
मिरज : कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या बंदी आदेशास शहरात बेशिस्त नागरिक आणि व्यावसायिकांनी ठेंगा दाखवला आहे. शहरात वाढदिवस, विवाह सोहळ्यांसारखे कार्यक्रम राजरोसपणे रस्त्यांवर साजरे होत आहेत. दिवसा होणाऱ्या कार्यक्रमांबाबत महापालिका कारवाया करत असल्याने शक्यतो कार्यक्रम रात्री उशिरा घ्या, असे सल्ले पोलिसांकडून संयोजकांना दिले जात आहेत.
सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत नसले, तरी ते सापडणारच नाहीत, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राज्यात सार्वजनिक समारंभ, विवाह सोहळे, यात्रा जत्रांसह उरूस यासारख्या गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी आहे. रस्त्यावर फिरताना मास्क घालणे बंधनकारक आहे.
अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका देते.
कार्यक्रमाचे आयोजन करताना पन्नासपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार नाहीत याची खबरदारी संयोजकांनी घ्यायची आहे. पण हे सगळे नियम धाब्यावर बसवून शहरात सर्व व्यवहार सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाढदिवसाचे सोहळे हे दिवसापेक्षा रात्रीच्यावेळी अधिक रंगतदार आणि दिमाखात गर्दी खेचणारे होत आहेत. अनेक विवाह सोहळ्यांना शहरातील नगरसेवक गल्ली बोळातील नेतेमंडळीना निमंत्रित करून हजारोंच्या उपस्थितीत जेवणावळी पार पडत आहेत. याच विवाहसोहळ्यापूर्वी हळदीचे कार्यक्रमही रात्री उशिरापर्यंत रंगत आहेत. पोलिसगाडीचा सायरन हा याच मंडळींसाठी इशारा ठरला आहे.
दुसरीकडे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना हेच विवाह सोहळे लाखो रुपयांची दंड वसुली करून चमकोगिरी करण्यासाठी पोषक ठरत आहेत. लक्ष्मी मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून विनामास्क मोटारसायकलींवर होणाऱ्या कसरतींमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक ठिकाणचे हे बेजबाबदार वर्तन पोलिस आणि महापालिकेस कमाईचे साधन बनले असले, तरी सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी हे सगळे धोकादायक ठरते आहे.
बेशिस्त वर्तन करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेतर्फे कारवाया सुरूच आहेत. तरीही सर्वत्र गल्लीबोळात जाऊन कारवाया करणे अपुऱ्या यंत्रणेमुळे शक्य होत नाही. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई केली जात आहे.
- दिलीप घोरपडे, सहाय्यक आयुक्त महापालिका
संपादन : प्रफुल्ल सुतार