मिरज तहसील कार्यालयाचा परिसर बनला कचरा कोंडाळा 

Miraj Tehsil Karyalayacha Complex Bunla Garbage Condola
Miraj Tehsil Karyalayacha Complex Bunla Garbage Condola

मिरज : तहसील कार्यालय म्हणजेच तालुक्‍याचे प्रशासकीय कार्यालय. मात्र याच कार्यालयाचा परिसर कचरा कोंडाळा बनला आहे. जिन्यावरील भिंती पिचका-यांनी रंगल्या आहेत. तहसील परिसर कचऱ्यांनी भरला आहे. जप्त वाहने गंजलेल्या अवस्थेत पडून आहेत. बेशिस्त वाहन पार्किंग ज्येष्ठ आणि अंध, दिव्यांगांसाठी कायमचा अडथळा ठरली आहेत. 

तहसीलचे प्रशासन पारदर्शी म्हणून मिरज शहरात परिचित आहे. मात्र हा पारदर्शीपणा स्वच्छतेसह पार्किंग, प्रत्येक विभागातील एजंटगिरी रोखण्यास असमर्थ ठरला आहे. तहसीलमध्ये येणा-या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केंद्र सरकार सहित राज्य सरकार स्वच्छ भारत, स्वच्छ शहर आणि स्वच्छ तालुका यासाठी कसोशीने प्रयत्नशील आहे. मिरज तहसीलमधील खराब आणि मद्याच्या बाटल्यांनी भरलेली स्वच्छतागृहे, परिसरात विखुरलेला कचऱ्यांचा ढिग आणि यातून निर्माण झालेली दुर्गंधी विविध विभागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना हैराण करत आहे. 

कोरोना साथीमुळे चेहऱ्यावर कायम मास्क लावावा लागतो. तहसीलच्या दुस-या मजल्यावर जाताना जिन्या शेजारची दुर्गंधी मास्क सहित डब्बल रूमाल बांधूनही नाकात शिरल्याशिवाय राहत नाही. आणि जीव गुदमरतो. तहसील कार्यालय परिसरात बेकायदा वाळू वाहतुक केल्याबद्दल जप्त केलेले ट्रक धुळखात पडून आहेत. अनेकांची चाके खराब झाली आहेत. अनेक वाहने धुळीने माखली आहेत. पार्किंगची समस्या खूप तीव्र आहे. "दिसली जागा की लाव गाडी' यामुळे ज्येष्ठ, अंध, दिव्यांगांना पेन्शनच्या कामासाठी येताना फार दमछाक करावी लागते. संजय गांधी पेन्शन योजना, सहाय्यक उपनिबंधक कार्यालय, नगरभूमापन कार्यालय या ठिकाणी विनामास्क गर्दी नित्याची झाली आहे. 

सांडपाण्याचा नाही निचरा 
तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहातून सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी अधिकच पसरते आहे. स्वच्छतागृहाच्या नुतनीकरणाचे काम संबंधित विभागाकडून निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे सिध्द होत आहे. तरीही संबंधितांना कामाची पूर्ण बिले अदा करण्यात आली आहेत. 

महापालिका आणि तहसील कार्यालयाच्या समन्वयाआभावी स्वच्छता रखडली. ढिगभर कचरा साचला आहे. पार्किंग अडथळा या सर्वच गोष्टींना तहसील प्रशासनाने शिस्त लावली पाहिजे. 
- सुनिल मोरे, सामाजिक कार्यकर्ते 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com