esakal | मिरजेत भाजी मंडईचे काम रखडले; खंदकात पुन्हा भरले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Miraj vegetable market work pending; The trench was refilled with water

वर्षभरापूर्वी डामडौलात सुरू झालेले मिरज येथील नव्या भाजीमंडईचे काम नेहमीप्रमाणे रखडले आहे. साहजिकच शहरातील भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या किरकोळ मालविक्रीसाठीच्या जागेची समस्या आता आधिकच गंभीर बनली आहे. 

मिरजेत भाजी मंडईचे काम रखडले; खंदकात पुन्हा भरले पाणी

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) : वर्षभरापूर्वी डामडौलात सुरू झालेले येथील नव्या भाजीमंडईचे काम नेहमीप्रमाणे रखडले आहे. साहजिकच शहरातील भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या किरकोळ मालविक्रीसाठीच्या जागेची समस्या आता आधिकच गंभीर बनली आहे. 

तत्कालीन मिरज संस्थानकडून 1921 मध्ये लक्ष्मी मार्केट या नावाने भाजी मंडई आणि दुकान गाळे असा त्या काळातील एक प्रकारचा मॉलच शहरात उभारला. जी इमारत आज मिरजेची शान म्हणून ओळखली जाते. त्यानंतर गेल्या शंभर वर्षात शहर कितीतरी पटींनी वाढले पण त्यामध्ये शहरात भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी आणि किरकोळ भाजीविक्रेत्यांची सोय करणे शहराचे कारभारी म्हणून घेणाऱ्यांना जमले नाही.

यावर उपाय म्हणून महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर कोटींच्या विशेष अनुदानातून दहा कोटी रुपयांची भाजी मंडई बांधण्याचा भव्यदिव्य आराखडा तयार केला. 
शहरातील खंदक परिसरात भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन अत्यंत घाईगडबडीत केले आणि या प्रकल्पाची पायाभरणीही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी मोठ्या डौलात उरकली.

शहरातील नागरिकांना ही अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या भाजीमंडईचा प्रयत्न मार्गी लागल्याचे समाधान मिळाले, परंतु आता मात्र याच घटनेबाबत मिरजेच्या नागरिकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. भाजीमंडईच्या उभारणीतील अडथळे थांबेनात. शहराच्या विकास आराखड्यात सध्याची जागा भाजी मंडईसाठी आरक्षित असूनही शहरातील काही कारभाऱ्यांनी काही भूखंड माफियांना पुढे करून या कामात कायदेशीर अडथळे निर्माण केले आहेत. ज्यामुळे हे काम पुन्हा रखडले आहे. 

सध्या या जागेवर प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने जोर धरल्याने भाजीविक्रेत्या तसेच शेतकऱ्यांचा किरकोळ भाजी विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नियोजित भाजी मंडईच्या उभारणीची पुन्हा एकदा नागरिकांना आठवण झाली आहे. 

शहराचा काय विकास करणार?

शहरातील भाजी मंडई ही मूलभूत सुविधा आहे. याची जाणिव महापालिकेतील कारभाऱ्यांना नसावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही. शेकडो वर्षांत या शहरातील कारभाऱ्यांना साधी भाजीमंडई उभारता येत नसेल, ते मिरज शहराचा काय विकास करणार? 
- अभिषेक प्रभूदेसाई, मिरज 

आम्हाला आता लक्ष घालावेच लागणार
महापालिकेच्या सर्व यंत्रणा कोरोनामध्ये व्यस्त असल्यामुळे प्रशासनाचे भाजी मंडईच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले. पण याच्या मोजणीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेऊन भाजी मंडईचे काम त्वरित सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामध्ये आम्हाला आता लक्ष घालावेच लागणार आहे. 
- स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका विभागीय कार्यालय, मिरज 

संपादन : युवराज यादव

loading image
go to top