सांगलीकर वैशाली बनली ‘मिसेस इंडिया’

घनश्याम नवाथे
गुरुवार, 31 मे 2018

सौंदर्य आणि बुद्धिमतेच्या कसोटीवर तिने स्वत:ला सिद्ध करत ‘मिसेस इंडिया’ च्या मुकुटावर वैशाली पवारने स्वत:चे नाव कोरले.

सांगली - लाखो चाहत्यांच्या शुभेच्छा आणि ‘लाईक्स’ मिळवून ‘मिसेस इंडिया वर्ल्ड 2018’ सौंदर्य स्पर्धेत उतरलेल्या सांगलीकर वैशाली पवारने ती आली...तिने पाहिले...आणि जिंकले असाच माहोल दिल्लीतील ‘ग्लॅमरस’ दुनियेत निर्माण केला. सौंदर्य आणि बुद्धिमतेच्या कसोटीवर तिने स्वत:ला सिद्ध करत ‘मिसेस इंडिया’ च्या मुकुटावर स्वत:चे नाव कोरले. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच वैशिष्ट्यपूर्ण भारतीय पोशाखात वैशालीचा मुकुट प्रदान सोहळा रंगला. ‘मिसेस वर्ल्ड’ साठी आता तिची निवड झाली आहे.

मूळची सांगलीकर आणि कर्नाटकची सून झालेल्या वैशालीची नुकतीच नवी दिल्लीतील ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली होती. निवडीनंतर वैशालीवर लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सौंदर्य स्पर्धेचा मुकुट पटकावणारच असा प्रचंड आत्मविश्‍वास घेऊन ती स्पर्धेत उतरली. ‘मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन’ स्पर्धेतील विजेतेपदाचा अनुभव तिच्या पाठीशी होता. दिल्ली येथील ‘किंग्डम ऑफ ड्रीम्स’ मध्ये अतिशय भव्य आणि दिव्य ग्लॅमरस वातावरणात चार दिवस स्पर्धा रंगली. पहाटे पाच वाजता दिवस सुरू होऊन मध्यरात्रीनंतर दोन किंवा पहाटे तीन वाजता संपायचा. वेगवेगळ्या कसोट्यांवर स्वत:ला सिद्ध करायला लागायचे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी विविध फेर्‍यांत तिने चुणूक दाखवली. मुलाखतीमध्ये प्रेक्षणीय वारसा स्थळांच्या संरक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा संवर्धनावर विशेष भर दिला. त्यामध्ये तिला सर्वाधिक गुण मिळाले.

vaishali pawar

महाविद्यालयीन जीवनात तिने अनेक किल्ले संवर्धनात पुढाकार घेतल्याचे सांगितले. त्यानंतर दोन परीक्षकांच्या प्रश्‍नांची उत्तर फेरी होती. फिटनेस फेरी, भारतीय पोशाख प्रतिनिधीत्व, पाश्‍चिमात्य पोशाख प्रतिनिधीत्वमध्ये तिने सर्वांची मने जिंकली. टॅलेंट फेरीमध्ये वैशालीने ‘सेलीन डायोन’ या गायिकेचे गाणे गाऊन स्वत: उत्तम गायिका असल्याचे सिद्ध केले. स्पर्धेतील इतर स्पर्धक, प्रशिक्षक आणि कर्मचार्‍यांशी प्रेमळ वागून तिने सर्वात प्रेमळ स्पर्धक असल्याचा ठसा उमटवला. मॉडेलिंगमधील स्वत:चा अनुभवही तिने इतर स्पर्धकांना देऊन मदत केली. संपूर्ण स्पर्धेत स्वत:ची वेगळी छाप पाडून वैशालीने अखेर ‘मिसेस इंडिया’ चा मुकुट बुधवारी (ता.30) पहाटे पटकावला. स्पर्धेच्या संयोजक व इव्हेंटच्या संचालक आयेझा नाज यांच्याहस्ते भारतीय पोशाखात सौंदर्यवती वैशालीला मुकुट प्रदान केला गेला. तेव्हा इतर सौंदर्यवतींनी एकच जल्लोष करत तिला शुभेच्छा दिल्या.

आता ‘मिसेस वर्ल्ड’ ची तयारी- ‘मिसेस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेचा मुकुट पटकावल्यानंतर ‘सकाळ’ शी बोलताना वैशाली म्हणाली, “आता पुढचे लक्ष्य ‘मिसेस वर्ल्ड’ आहे. डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी तयारी करायची आहे.” 

vaishali pawar

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Misses India Vaishali Pawar From Sangli