औषधं घेऊन येईपर्यंत 'तो' झाला गायब!

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मुलाचा शोध घेऊन थकले कर्नाटकातील रजपूत कुटुंबीय

सोलापूर : मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी भावासोबत आलेला कर्नाटकातील 22 वर्षीय तरुण सोलापुरात बेपत्ता झाला आहे. बाबूसिंग शंकरसिंग रजपूत (वय 22, रा. हणमंतवाडी, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे हरवलेल्या तरुणाचे नाव आहे. मेडिकलमधून औषधे घेऊन येईपर्यंत बाबूसिंग 6 नोव्हेंबर रोजी गायब झाला. बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच सर्व मंदिरांच्या परिसरात बेपत्ता मुलाचा शोध घेऊन कुटुंबीय थकले आहेत. 
बाबूसिंग बेपत्ता झाल्याची तक्रार भाऊ रामलाल शंकरसिंग रजपूत यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली आहे. 6 नोव्हेंबर रोजी मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेण्यासाठी बाबूसिंग हा भाऊ सूरजसिंग रजपूत याच्यासोबत आला होता. दुपारी दोनच्या सुमारास नवी पेठ परिसरातील बुरटे हॉस्पिटल परिसरातील मेडिकलमधून औषधे घेण्यासाठी सूरजसिंग गेला. औषधे घेऊन येईपर्यंत बाहेर थांबलेला बाबूसिंग बेपत्ता झाला होता. घाबरलेल्या सूरजसिंग याने परिसरात शोध घेतला, मात्र बाबूसिंग सापडला नाही. मग त्याने गावाकडे कुटुंबीयांना कळविले. मुलगा हरविल्याचे कळताच कुटुंबातील सदस्य सोलापूरला आले. गेल्या सहा दिवसांपासून सोलापुरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, सिद्धेश्‍वर मंदिर यासह शहरातील इतरही मंदिरांच्या परिसरात रजपूत कुटुंबीयांनी बाबूसिंगचा शोध घेतला आहे. 
दरम्यान, शोधाशोध करूनही भाऊ सापडत नसल्याने शेवटी रामलाल यांनी फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली. बाबूसिंग बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस नाईक पी. व्ही. कदम हे तपास करत आहेत. 
-- 
मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू असलेल्या बाबूसिंग यास हिंदी आणि कन्नड भाषा येते. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट आणि काळी पॅंट आहे. त्याच्याविषयी कोणाला माहिती असल्यास फौजदार चावडी पोलिस ठाण्यात किंवा 9850499758 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing young at solapur

फोटो गॅलरी