प्रणिती शिंदेंचे आता 'मिशन हॅट्रीक - 2019'

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 30 जुलै 2019

विधानसभेच्या दोन निवडणुका सहज जिंकणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना यंदा मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा समर्थकांनी मिशन हॅट्रीक-2019 ची रणनीती आखली आहे.

सोलापूर : विधानसभेच्या दोन निवडणुका सहज जिंकणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना यंदा मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा समर्थकांनी मिशन हॅट्रीक-2019 ची रणनीती आखली आहे.

जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढल्यानंतर प्रणिती यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यावेळी त्यांच्यासमोर आव्हान होते. तत्कालीन आमदार नरसय्या आडम आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांचे. त्यावेळी त्यांनी आडम यांचा पराभव करीत पहिला विजय मिळवला. त्यांना 68 हजार 028, आडम यांना 34 हजार 664 तर बरडे यांना 26552 मते मिळाली. 2014 मध्ये मात्र प्रणितींना पूर्वाश्रमीच्या
कॅंाग्रेसवासियांसोबतच लढावे लागले. त्यामध्ये महेश कोठे आणि तौफीक शेख यांचा समावेश होता. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती नव्हती, त्याचा फायदा प्रणिती यांना झाला. 2009 मध्ये 12 जण रिंगणात होते, तर 2014 मध्ये 27 जण रिंगणात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभागणी झाली. या निवडणुकीत प्रणिती यांना 46 हजार 907, शेख यांना 37 हजार 138, कोठे यांना 33 हजार 334 आणि प्रा. मोहिनी पतकी यांना 23 हजार 319 मते मिळाली. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असती तर श्री. कोठे यांचा विजय निश्चित होता, मात्र प्रा. पतकी यांना मिळालेल्या मतांना प्रणिती यांना तारले, तर आडम मास्तर थेट पाचव्या क्रमांकावर गेले.  

पहिल्या निवडणुकीत सहज तर दुसऱ्या निवडणुकीत मतविभागणीचा फायदा मिळालेल्या प्रणिती शिंदे यांना यंदा अनेक आव्हानांना समोर जावे लागणार आहे. हक्काची व्होट बॅंक असलेल्या मोची आणि मुस्लीम समाजाने थेट या मतदारसंघावर दावा केल्याने निवडणुकीपूर्वीच त्यांना धक्का बसला आहे. या मतदारसंघातून पूर्वी उमेदवारीसाठी कुणी मुलाखतही द्यायचे नाहीत, यंदा त्यांच्यासह चारजणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामध्ये दोन मुस्लीम तर एक सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. मोची आणि मुस्लीम समाजाने आपली भूमिका कायम ठेवली तर त्याचा मोठा फटका प्रणितींना बसू शकतो. या सर्व घडामोडींचा विचार करून त्यांनी मोहोळची जागा लढवावी असा सूर व्यक्त होते. येत्या काही दिवसांत सोलापूरच्या राजकारणाच्या पटलावर मोठ्या प्रमाणात घडामोडी होणार आहेत, त्याचा अंदाज बांधूनच आमदार शिंदे यांच्या समर्थकांनी मिशन हॅट्रिक-2019 आखले आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतील हे निकालानंतरच स्पष्ट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mission hattrick by MLA Praniti Shinde