शिवाजी विद्यापीठात साडेतीन हजार निकालांत त्रुटी

शिवाजी विद्यापीठात साडेतीन हजार निकालांत त्रुटी

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विविध परीक्षांसाठी बसलेल्या सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी असल्याची माहिती पुढे आली आहे. दहा वेळा चकरा मारूनही निकालातील त्रुटी दूर होत नसल्याने विद्यार्थ्यांचा पारा मात्र वाढत आहे. प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा सोपस्कार पूर्ण केला जात असून, निकालासाठी आणखी किती प्रतीक्षा करायची? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर आहे. 

जुलै २०१७ मध्ये ‘एमकेसीएल’कडून परीक्षांचे कामकाज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे आले. ऑक्‍टोबर २०१७ मध्ये सुमारे २३ हजार रिपीटर विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ‘एमकेसीएल’कडून डाटा ‘मायग्रेट’ झाले नसल्याने त्यांच्या निकालाचे केवळ स्टेटस परीक्षा विभागाने जाहीर केले. नोव्हेंबर २०१७ मध्ये निकालाच्या कामकाजासाठी विद्यापीठाने एजन्सीची नेमणूक केली. ऑक्‍टोबर २०१७ च्या परीक्षेस अनुत्तीर्ण झालेले १२ हजार विद्यार्थी मार्च २०१८ च्या परीक्षेस बसले. त्यातील साडेआठ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात येते.

प्रामुख्याने २००८ ते २०१४ मधील विद्यार्थ्यांचे इक्विव्हॅलंट कोड व ब्रॅंच आयडी हाही निकाल जाहीर करण्यातला अडथळा आहे. साडेतीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी आहेत. सर्व विषयांत उत्तीर्ण आहे. पण, गुणपत्रिकेत ‘फेल’ असा उल्लेख आहे. फोटोकॉपी तपासल्यानंतर काही प्रश्‍नांना गुण दिलेलेच नाहीत. निकालात शून्य गुण दिले आहेत. काही ठिकाणी गुणांचा उल्लेखच नाही, असे प्रकार त्यात दिसत आहेत. 

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्याकडेच थेट निकालाचे गाऱ्हाणे विद्यार्थ्यांकडून मांडले जात आहे. परीक्षा भवन दोनमधील प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांची रेलचेल दिसते. भवनमधील जिन्यालगत कर्मचाऱ्यांकडून निकालात त्रुटी राहिलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी केली जात आहे. पाच दिवसांतील त्यांचा आकडा ४५० इतका आहे. 

रोजंदारीवर जबाबदारी
आयटी विभागात सहा नियमित व रोजंदारीचे सुमारे आठ कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यार्थी थेट त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात. श्री. काकडे बैठका घेऊन निकालाचा आढावा घेत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने कामाची जबाबदारी रोजंदारी कर्मचाऱ्यांवर आली आहे. तसेच, प्रशासनातील काही विभाग निकाल लावण्याची जबाबदारी झटकत असल्याचेही दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com