(व्हिडीओ) : "भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

केंद्र सरकारच्या सुधारित नागरित्व कायद्याला कुठे समर्थन, तर काही ठिकाणी विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चा व विविध सामाजिक संघटनांतर्फे बुधवारी "भारत बंद' पुकारण्यात आला होता. त्यात देशातील 31 राज्यांतील 550 जिल्ह्यांनी सहभाग घेतला.

नगर : बहुजन क्रांती मोर्चा व विविध सामाजिक संघटनांतर्फे सुधारित नागरित्व कायद्याविरोधात बुधवारी (ता.29) पुकारण्यात आलेल्या "भारत बंद'ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात जागोजागी शांततापूर्ण निदर्शने व सभांचे आयोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा- राहुरी फॅक्‍टरीवर देवळाली पालिकेचे कार्यालय 

केंद्र सरकारच्या सुधारित नागरित्व कायद्याला कुठे समर्थन, तर काही ठिकाणी विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चा व विविध सामाजिक संघटनांतर्फे बुधवारी "भारत बंद' पुकारण्यात आला होता. त्यात देशातील 31 राज्यांतील 550 जिल्ह्यांनी सहभाग घेतला.

शांततेत आंदोलनाचे आवाहन

नगरमधील इंम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बुधवारी सकाळी 11 वाजता विविध सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय', "हमे चाहिये आजादी' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आयोजकांनी उपस्थित कार्यकर्त्यांना, नागरिकांना शांततेत आंदोलन करण्याचे, तसेच लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी "रास्ता रोको' आंदोलन न करण्याचे आवाहन केले. 

स्कूलबस बंद, शाळा सुरू

बहुजन क्रांती मोर्चासह विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या "भारत बंद'मुळे शहरातील काही शाळांच्या स्कूलबस बंद होत्या; मात्र त्याच वेळी शाळा सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडविण्याची व घरी आणण्याची जबाबदारी पालकांनाच पार पाडावी लागली. 

इसळकच्या ग्रामसभेत ठराव

इसळक (ता. नगर) येथील ग्रामसभेत सुधारित नागरिकत्व कायद्याला आव्हान देणारा ठराव करण्यात आला. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत विधेयक मंजूर करून घेतले. मात्र, संसदेच्या निर्णयाला इसळकच्या ग्रामसंसदेने आव्हान दिले आहे. या कायद्यात बदल अथवा सुधारणा कराव्यात, अन्यथा असहकार आंदोलन करून संविधानीक पद्धतीने निषेध करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे. 

band

नगर शहरात काही ठिकाणी "बंद' 

"भारत बंद'ला नगर शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरातील काही भाग वगळता स्वयंस्फूर्तीने कडकडीत "बंद' पाळण्यात आला. सकाळी 11 वाजता जूने बसस्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तेथेच एनआरसी, सीएएविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हाजी शौकत तांबोळी, मन्सूर शेख, राजेंद्र करंदीकर, उबेद शेख, डॉ. परवेज अशरफी, घुगे शास्त्री महाराज, राज मोहंमद नूरी, अशोक गायकवाड, अर्शद शेख, बाळासाहेब मिसाळ, मौलाना खलील नदवी, मौलाना अबुल सालेम, मतीन सय्यद, डॉ. भास्कर रणन्नवरे, सोमनाथ शिंदे, आकाश जाधव आदी सहभागी झाले होते. 

अवश्‍य वाचा - सोशल मैत्री अंगलट ः मोबाईल भेटीसाठी मोजले 22 लाख 

विविध संघटनांचा पाठिंबा

शहरातील माळीवाडा, पंचपीर चावडी, तख्ती दरवाजा चौक, माणिक चौक, कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सर्जेपुरा, लालटाकी, मुकूंदनगर, पीरशहा खुंट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, तसेच भिंगारमधील काही भागात कडकडीत "बंद' पाळण्यात आला. इतर ठिकाणी "बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जमाते उलेमा ए हिंद, जमाते इस्लामे हिंद, जमाते अहले हदिस, सुन्नी उलेमा कौन्सिल, भारतीय विद्यार्थी मोर्चा, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, युनायटेड रिपाई, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी संघटना आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला. 

band

श्रीरामपूर : बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला.

श्रीरामपूरात दुपारपर्यंत दुकाने बंद

बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या "भारत बंद'ला श्रीरामपूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य रस्त्यासह उपनगरातील दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवली होती. शहरातील सय्यदबाबा चौक, मौलाना आझाद चौक, दशमेश नगर परिसरात सकाळपासून कडकडीत "बंद' पाळण्यात आला. शिवाजी रस्ता, संगमनेर रस्ता, बेलापूर रस्त्यावरील काही व्यावसायिकांनी "बंद'मध्ये सहभाग घेतला. काहींनी दुपारनंतर दुकाने उघडली. संविधान बचाव समिती, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, शीख समुदाय, राष्ट्रीय ख्रिश्‍चन मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, समाजवादी पार्टी, एमआयएम, भीम आर्मी, जमियत उलेमा संघटनांनी "बंद'ला पाठिंबा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mixed response to strike against CAA