युतीच्या व्यासपीठावर अमल महाडिक जाणार?

युतीच्या व्यासपीठावर अमल महाडिक जाणार?

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील भाजप-सेना युतीचा राज्याचा प्रचार प्रारंभ २४ मार्च रोजी कोल्हापुरात होत असून या प्रचाराच्या व्यासपीठावर भाजपचे आमदार अमल महाडिक, त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे जाणार का, असा प्रश्‍न राजकीय क्षेत्राला पडला आहे. 

निवडणुकीत आमदार महाडिक यांचे चुलत बंधू खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आजच त्यांची पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत श्री. महाडिक आमदार झाले आहेत. साडेचार वर्षे ते भाजपशी एकनिष्ठ आहेत. विधानसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पत्नी शौमिका यांनाही भाजपच्या तिकिटावर शिरोली गटातून निवडून आणले. ज्या पदाने त्यांना हुलकावणी दिली होती, ते अध्यक्षपदही सौ. महाडिक यांना देताना त्यांच्यासह त्यांचे वडील माजी आमदार महादेवराव महािडक यांनी जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपची सत्ताही आणली. 

लोकसभा निवडणुकीत मात्र आमदार महाडिक यांच्यासमोर ‘युती धर्म की बंधुप्रेम’ असे धर्मसंकट असेल. पण काही दिवसांपासून त्यांच्या पत्नी शौमिका यांनी खासदार महाडिकांचा प्रचार सुरू केला. रामकृष्ण हॉलमध्ये झालेल्या महिला मेळाव्यात खासदार महािडक यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे आमदार महाडिक यांनीही खासदार महाडिक यांच्या प्रचारार्थ येवती (ता. करवीर) येथे झालेल्या मेळाव्यात शेवटच्या क्षणी हजेरी लावून आपली भूमिका काहीअंशी का होईना स्पष्ट केली आहे.  या पार्श्‍वभूमीवर युतीच्या प्रचार प्रारंभाच्या सभेत महाडिक दाम्पत्य उपस्थित रहाणार का, याविषयी उत्सुकता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेची प्रतीक्षा
या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रचारात राहू दे, निदान सभेला तरी उपस्थित राहावे लागेल. प्रत्यक्षात काय होणार यासाठी २४ मार्चची प्रतीक्षा करावी लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com