आमदार अमल महाडिक यांचे असे आहेत भविष्यातील संकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

भविष्यात  कोल्हापूर शहर हे पुण्यानंतरचे एक मोठे सेंटर व्हावे यादृष्टीने माझा पाठपुरावा असणार आहे. शहरात महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल, एक अद्ययावत सुसज्ज असे विभागीय कॅन्सर हॉस्पिटल, पाच एकर जागेतील भव्य नाट्यगृह, शहराबाहेर ट्रक टर्मिनल असे आपले भविष्यातील संकल्प असल्याचेही आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी दिली. ‘सकाळ’ कार्यालयात त्यांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधला.

भविष्यात  कोल्हापूर शहर हे पुण्यानंतरचे एक मोठे सेंटर व्हावे यादृष्टीने माझा पाठपुरावा असणार आहे. शहरात महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल, एक अद्ययावत सुसज्ज असे विभागीय कॅन्सर हॉस्पिटल, पाच एकर जागेतील भव्य नाट्यगृह, शहराबाहेर ट्रक टर्मिनल असे आपले भविष्यातील संकल्प असल्याचेही आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

आमदार  अमल महाडिक म्हणाले, ‘‘शहरात प्रापॅर्टी कार्ड हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न होता. लालफितीच्या कारभारामुळे वर्षानुवर्षे हा प्रश्‍न प्रलंबित होता. गेल्या अनेक वर्षापासून मी यासाठी पाठपुरावा करत होतो. आता हा प्रश्‍न निकालात निघाला आहे. पहिल्या टप्यात २२०० प्रॉपर्टी कार्ड मी देणार असून, ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आमचे नियोजन आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यांना हक्काचा आणि कायमचा निवारा मिळण्यात प्रॉपर्टी कार्ड नसणे हा मोठा अडथळा होता. तो दूर होणे गरजेचे होते. यानिमित्ताने एक मोठा विषय मी संपवत आणला आहे. 
ट्रान्स्पोर्ट व्यवसायासमोर आव्हाने असली तरी युनियन, लोकप्रतिनिधी आणि शासन यांनी समन्वयाने काही प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे एक देश एक कर आहे. इंधनाचाही समावेश त्यामध्ये व्हावा आणि करामध्ये सूसत्रता आणावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. यामध्ये शासन निश्‍चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. टोलच्या विषयाबाबतही केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनेक टोल कमी झाले आहेत. आपला महामार्ग सातारा ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रश्‍नही संपण्यास मदत होणार आहे. वाहतूकदारांचे म्हणून जे काही प्रश्‍न असतील ते संपविण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. मला स्वत:ला या व्यवसायातील माहिती आहे. त्यामुळे प्रश्‍नही चांगल्या पद्धतीने माहीत आहेत.

शहरात वाहतुकीच्या कोंडीची समस्या आहेत. मोठी वाहने शहरात आणून वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे शहराबाहेर प्रशस्त जागेत चांगले अद्ययावत ट्रक टर्मिनस उभा करण्याचा आमचा मनोदय आहे.त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या ट्रक टर्मिनसमध्ये ड्रायव्हर, क्‍लिनर यांच्या राहण्याची व्यवस्था, चांगल्या स्वछतागृहाची व्यवस्था, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरच ताण कमी पडणार आहे.  तसेच ट्रकचालक, वाहकांचीही व्यवस्था होणार आहे’’

सहकारक्षेत्रात या सरकारने खूप चांगले काम केले आहे. बचत गटांना बिनव्याजी कर्जे देण्याची योजना याच सरकारने आणली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना त्याचा लाभ मिळत आहेत. सहकारी पतसंस्थानीही आता आपल्यामध्ये काही बदल करायला हवेत. तज्ज्ञांशी बोलूनच याबाबत काय उपाययोजना करता येतील, याकडे पाहिले पाहिजे, असेही आमदार महाडिक 
यांनी सांगितले

आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘‘सांस्कृतिक क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चित्रनगरीतील अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. आता अद्ययावत असा स्टुडिओ या चित्रनगरीत उभा केल जाईल. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे त्यासाठी सकारात्मक आहे. हा स्टुडिओ झाला तर मुंबईनंतर शूटिंगसाठी कलाकार कोल्हापूरलाच प्राधान्य देतील. त्याचबरोबर आता विमानसेवाही सुरळीत होत आहे. त्यामुळे कोल्हापूरला रोजगारवाढीच्या संधी आहेत. त्यादुष्टीने आपले प्रयत्न राहणार आहेत.

शहरातील आणि उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस असा कृती आराखडा महापालिकेने करायला हवा.सर्पदंश आणि श्‍वानदंशाची औषधे पुरविणाऱ्यावरच सरकारी रुग्णालयांचा मोठा खर्च होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महापालिका, ग्रामपंचायतीनी त्यादृष्टीने ठोस उपाययोजना करायला हव्यात. कृती आराखडा तयार करावा. लोकप्रतिनिधी म्हणून राज्यशासनाकडून जी काही मदत लागेल ती मदत देण्यासाठी निश्‍चितच आम्ही पुढाकार घेऊ.’’

विभागीय कॅन्सर हॉस्पिटलसाठीही प्रयत्न
कोल्हापुरात विभागीय कॅन्सर हॉिस्पटलची गरज आहे. यासाठी ५० एकर जागा लागणार आहे. शहर अथवा प्राधिकरण विभागात त्यासाठी जागेचा शोध घेतला जाणार आहे. औरंगाबादच्या धर्तीवर कोल्हापुरात हे कॅन्सर हॉिस्पटल होईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे हॉिस्पटल कोल्हापूरला देण्यासाठीही सकारात्मकता दाखविली आहे. प्रत्येक बाबतीत कोल्हापूरला विभागीय दर्जा द्यायचा याच दृष्टीने माझा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘‘शेंडा पार्कच्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय विद्यालयासाठीचे एक स्वतंत्र ६५० बेडचे हॉिस्पटल असेल. हा परिसर एक मेडिकल हब होईल, असा प्रस्ताव आहे. लवकरच या सर्व गोष्टी आकाराला येताना दिसतील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Amal Mahadik interview in Sakal