कृष्णेचे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाला मिळण्यासाठी ठरवावे धोरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

आटपाडी - कृष्णेतून दरवर्षी पावसाळयात अतिरिक्त पाणी वाहून जाते. त्याचा योग्य वापर होण्यासाठी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना या कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात. त्यामुळे दुष्काळी भागाला अतिरिक्त 30 टीएमसी जादा पाणी मिळू शकते. या संबंधी राज्य सरकारने 2016 मध्ये घेतलेला निर्णय धोरणात्मक कायम करावा, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.

दरवर्षी कृष्णा नदीतून पावसाळ्यात अतिरिक्त पाणी वाहून जाते. यावर्षी तर महापुर आला. यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. वाया जाणारे पाणी कायमस्वरूपी दुष्काळी भागाला सिंचन योजनांच्या माध्यमातून देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी दुष्काळी भागातून होत आहे.

यासंदर्भात आमदार बाबर म्हणाले, 'यावर्षीच्या भीषण महापुरात दहाच दिवसात अंदाजे दीडशे टीएमसी अतिरिक्त पाणी वाहून गेले. या उलट पूर्वभागात भीषण पाणी टंचाई आहे. शेकडो टँकर सुरू असून यावर लाखो रूपये खर्च होतात. ते पाणी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैसाळ, उरमोडी आणि जिहे - कठापूर योजनेतून दुष्काळी भागाला दिल्यास जादा पाणी मिळू शकते. या योजना दरवर्षी एकशे चाळीस ते पन्नास दिवस चालवल्या जातात. यात पावसाळ्यात ज्यादा चालून 225 ते 250 दिवस चालवल्यास याचा मोठा लाभ दुष्काळी भागाला होईल.'          

ते म्हणाले, '2005 मध्ये महापूर आला. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी मनिषा म्हैसकर यांनी अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता, मात्र 'याचा सरकारला लाभ काय' असा सवाल करून अर्थ विभागाने तो तसाच ठेवला. 2016 मध्ये युती सरकारने अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला होता आणि अंमलबजावणीही केली होती. यावर्षी तो कायम करावा आणि कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेतला जावा, अशी मागणी केली आहे. यामुळे ताकारी, टेंभू, म्हैशाळ उरमोडी आणि जिहे कटापूर योजनातून दुष्काळी भागाला अतिरिक्त 30 टीएमसी पाणी मिळू शकते.'                

तीन दिवसात होणार टेंभू सूरू 

आमदार बाबर म्हणाले,' टेंभूचे पंपगृह पाण्यात बुडाल्याने ते दुरस्तीचे काम सूरू केले आहे. मात्र हिंगणगाव तलावातून पाणी वाहून चालले आहे. ते माहुलीत आणून तीन दिवसात उचलून आटपाडीला विज बिल न भरता दिले जाणार आहे.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Anil Babar Demand to Chief Minister Devendra Fadnavis