मुंबईत घडलेले सोलापुरात सांगायला वेळ लागणार नाही : खा. बनसोडे

संतोष सिरसट
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

सोलापूर : मुंबईत काय काय घडते ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही. निवडणूक लढवायची असेल तर आपली कामे सांगून समोरासमोर या. जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यायचे ते. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर त्यांच्या घरातून योग्य ते संस्कार न झाल्यानेच त्यांनी असे बेताल व बालिश वक्तव्य केल्याचे खासदार शरद बनसोडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सोलापूर : मुंबईत काय काय घडते ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही. निवडणूक लढवायची असेल तर आपली कामे सांगून समोरासमोर या. जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यायचे ते. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर त्यांच्या घरातून योग्य ते संस्कार न झाल्यानेच त्यांनी असे बेताल व बालिश वक्तव्य केल्याचे खासदार शरद बनसोडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

गुरुवारी सोलापुरात झालेल्या एका कार्यक्रमात आमदार शिंदे खासदार बनसोडे यांचा "बेवडा' असा उल्लेख केला होता. त्यावर खासदार बनसोडे यांनी महिलांचा आदर करतो असे सांगत वैयक्तिक चारित्र्य हनन करून त्याचा गैरफायदा घेऊ नये, असे म्हटले आहे. मी "बेवडा' आहे हे पाहण्यासाठी आमदार शिंदे माझ्या घरी आल्या होत्या का? हे त्यांनी अगोदर सांगावे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या असे बालिश वक्तव्य करत असल्याचेही खासदार बनसोडे यांनी म्हटले आहे. 

आमदार शिंदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही जोरदार टीका केली होती. कॉंग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या कार्यक्रमाची उद्‌घाटने हे दोन्ही मंत्री करत असल्याचेही आमदार शिंदे यांनी म्हटले होते. त्याचवेळी सोलापूरचे खासदार "बेवडा' असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ज्यावेळी त्यांनी "बेवडा' असा उल्लेख केला होता, त्यावेळी त्यांच्यासमोर महिला कार्यकर्त्या होत्या. त्या स्थितीतही त्यांनी अशाप्रकारचा उल्लेख केला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. पालकमंत्री व सहकारमंत्र्यांवर आरोप केले जात आहेत. त्याला सत्ताधाऱ्यांकडूनही तोडीस-तोड उत्तरे दिली जात आहेत. सहकारमंत्री देशमुख यांनी माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काम न केल्यामुळेच आम्हाला संधी मिळाल्याचे विधान पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्या वक्तव्याचा सोशल मिडियावर निषेध करताना कुणाच्याही वैयक्तिक जीवनावर टीका करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

व्यक्तिगत जीवनावर कुणीच बोलू नये. आमच्याकडेही खूप काही बोलण्यासारखे आहे. पण, आम्ही ते बोलणार नाही. एकवेळ आम्ही वॉर्निंग देतो. यापुढे जर असे काही झाले तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- शरद बनसोडे, खासदार. 

आमदार शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध 
भाजपचे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांचा कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी "बेवडा' असा उल्लेख केला आहे. आमदार शिंदे यांनी केलेल्या या उल्लेखाचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. 

Web Title: MLA Bansode reaction on pranitee shinde s statement