कऱ्हाडला आमदार बंधूसह पुतणे भाजपच्या प्रवाहात ? 

कऱ्हाडला आमदार बंधूसह पुतणे भाजपच्या प्रवाहात ? 

कऱ्हाड ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून काही मतभेदामुळे दुरावलेले आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन चर्चा केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवाहातील या दोघांनी विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. 

महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री फडणवीस कालपासून ताफ्यासह कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. त्या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कऱ्हाड, सातारा येथील अनेक राजकीय मंडळींची भेट घेऊन चर्चा केली. आज सकाळी मुख्यमंत्र्यांची आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील यांनी भेट घेतली. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यापासून आनंदराव पाटील हे दुरावल्याने आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते सध्या चर्चेत आहेत. त्यांनी तीनच दिवसांपूर्वी मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यातच आज सकाळी त्यांचे पुतणे सुनील पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनीही भेट घेऊन चर्चा केली. त्यांची चर्चा नेमकी काय झाली, याबाबत नेमके त्यांनी काही सांगितले नाही. मात्र, ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी त्यांनी महसूलमंत्री पाटील यांचीही भेट घेऊन चर्चा केली होती. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवाहातील या दोघांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपमधून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील कदम यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. 

दोघेही भाजपच्या प्रवाहात? 

आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील या दोघांचीही भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची मानली जाते. ते दोघेही निवडणुकीत भाजपच्या प्रवाहात राहून कऱ्हाड दक्षिणमधील उमेदवार अतुल भोसले यांच्या पाठीशी राहणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोघांचा निर्णय काय होणार, याकडे लक्ष लागून आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com