राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा उद्या शिवसेनेत प्रवेश

प्रवीण डोके
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी ओळख असलेले दिलीप सोपल हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी ओळख असलेले दिलीप सोपल हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. सोपल यांच्या कार्यकर्त्यांकडून "10 तारीख, जय महाराष्ट्र ...." अश्या आशयाच्या पोस्ट सध्या फेसबुक वरती फिरत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही सांगितले जात आहे की 10 तारखेला सोपल साहेब शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री दिलीप सोपल हे मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये शिवसेना प्रवेश आणि विधानसभेचे तिकीट यासह अनेक बाबींवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सोपल शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. आता त्याच्या प्रवेशाने शनिवारी याला पूर्णविराम मिळणार आहे. शनिवारी दिलीप सोपल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

दिलीप सोपल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे सोपल यांच्या सेना प्रवेशाने भाजपचे नेते माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का असणार आहे. कारण शिवसेना - भाजप युतीच्या जागा वाटपात बार्शीची जागा ही सेनेकडे आहे. सध्या विद्यमान आमदार हे दिलीप सोपल असल्याने या ठिकाणी विधानसभेची जागा शिवसेनेलाच सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे ही जागा भाजपला सुटेल, अशी आस लावून बसलेल्या राऊत यांच्या स्वप्नांना सोपल यांच्या सेनाप्रवेशामुळे सुरंग लागणार आहे. सोपल हे प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी काहीतरी नवीन डाव टाकून निवडून येतात. एका दगडात दोन शिकारी करण्यासाठी प्रसिद्ध असणारे दिलीप सोपल पुन्हा एकदा राऊत यांना चीतपट करण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या बार्शी तालुक्यात रंगली आहे.

तर दुसरीकडे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही जोरदार तयारी चालवली आहे. काही दिवसांपूर्वी बार्शीत मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तिकीटाच मी बघतो तुम्ही तयारी सुरू करा असे सांगितले आहे. पक्षाचे एबी फॉर्म हातात आल्याशिवाय कोणते वासरू कोणत्या गाईला पिणार हे समजणार नाही असे राऊत यावेळी म्हणाले होते.

एका वृत वहिनीला बोलताना राऊत म्हणाले, सोपल आणि माझी कुस्ती ठरलेली आहे. तिकीट मिळो न मिळो मी अपक्ष लढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार नाही.

सोपल यांच्या कार्यकर्त्यांकडून सध्या 'झाला रे....जय महाराष्ट्र... वाघ मातोश्रीवर", "कसलं वादळ भगवं वादळ", "10 तारीख... जय महाराष्ट्र..." अश्या आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA dilip sopal may enters in shivsena tomorrow