तुम्ही दंगा कराल; तेवढा मला जास्त त्रास - मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कागल - ‘कारवाई का झाली, हे मलाही माहीत नाही. तो आजचा विषय नाही; पण जेवढा दंगा कराल, तेवढा मला त्रास होणार आहे,’ अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी घराबाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

कागल - ‘कारवाई का झाली, हे मलाही माहीत नाही. तो आजचा विषय नाही; पण जेवढा दंगा कराल, तेवढा मला त्रास होणार आहे,’ अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी घराबाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

दिवसभर प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या गराड्यातील मुश्रीफ रात्री आठच्या सुमारास घराबाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले. ते येताच ‘मुश्रीफ साहेबांचा विजय असो,’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर श्री. मुश्रीफ कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. अधिकारी मागतील ती माहिती मी देत आहे. तुम्ही जेवढा दंगा कराल, तेवढा मला त्रास होणार आहे.

सकाळपासून मी अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे, कशासाठी छापा पडला हा आजचा विषय नाही. आमचे घर, कारखाना आदी ठिकाणी छापा पडला आहे. केवळ माझ्यावरच नव्हे तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवशंकर यांच्या घरावरही छापे पडले आहेत. अधिकाऱ्यांना माहिती देणे ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही आता घरी जा. तुम्ही सहकार्य करणार नाही तोपर्यंत अधिकारी जाणार नाहीत. आपण जे माझ्यासाठी आलात, त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो.’’ 

दरम्यान, सकाळी आठ वाजता श्री. मुश्रीफ यांच्या घरी कारवाई झाली. त्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी सकाळपासून त्यांच्या घर व परिसरात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. श्री. मुश्रीफ घराबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. श्री. मुश्रीफ यांच्या आवाहनानंतरही रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते या परिसरात थांबून होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Hasan Mushrif comment