भाजपचे राज्यकर्ते युवकांच्या हाताला काम देण्यात अपयशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

‘‘ भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी नवी गुंतवणूक आणून देशातील २ कोटी युवकांना वर्षाला नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र नवी गुंतवणूक येऊन मुलांना रोजगार मिळाल्याचे कुठे दिसत नाही. उलट युवकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. "

इस्लामपूर - भाजपचे राज्यकर्ते युवकांच्या हाताला काम देण्यात अपयशी ठरले आहेत. उलट नोटाबंदी व जीएसटीमुळे अनेक कंपन्या अडचणीत येऊन १ कोटी १० लाख नोकरदार बेकार झाले, पेठ एमआयडीसी रद्द केली ही चूक झाली. अन्यथा कागल, खंडाळाप्रमाणे वाळवा तालुक्‍यातील ८ ते १० हजार युवक-युवतींना नोकरी मिळाली असती, असे मत  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस व जयंत करिअर गाईडन्सने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जयंत नोकरी मेळाव्या’च्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. युवानेते राजवर्धन व प्रतीक पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, आर. डी. सावंत, तालुकाध्यक्ष विजय पाटील, सभापती सचिन हुलवान, उपनगराध्यक्ष  दादासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले,‘‘भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी नवी गुंतवणूक आणून देशातील २ कोटी युवकांना वर्षाला नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र नवी गुंतवणूक येऊन मुलांना रोजगार मिळाल्याचे कुठे दिसत नाही. उलट युवकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आपला उत्साह व संख्या पाहून भविष्यात असे उपक्रम नेहमी घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’

राजवर्धन पाटील म्हणाले, ‘‘साहेबांनी टाटा कंपनीचा नॅनो प्रकल्प  तालुक्‍यात आणण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांनी वाडियांना पत्र लिहिले, ते इंटरनेटवर पहाण्यास मिळते. मात्र हा प्रकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला नेला. स्व. बापूंनी मंत्री असताना राज्यात एमआयडीसी उभारून ग्रामीण भागातील मुलांना रोजगार दिला.’’

युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांचे भाषण झाले. बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, बी. के. पाटील, छाया पाटील, अरुणादेवी पाटील, जगन्नाथ पाटील, ॲड. विश्वासराव पाटील उपस्थित होते. तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.  

Web Title: MLA Jayant Patil comment