आमदार पडळकर म्हणतात, "त्या' शपथेचं बिरोबा आणि धनगर आणि मी बघून घेतो.

सोमवार, 25 मे 2020

धनगर समाज माझा आहे. बिरोबांची शपथ मी घेतली हे खरेच. पण मी माझा समाज आणि बिरोबा आमचं आम्ही बघून घेतो. माझं काही चुकलं असेल तर बिरोबा बघून घेईल दुसऱ्यांनी त्यात लुडबुड करु नये असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

आमदार पडळकर म्हणतात, "त्या' शपथेचं बिरोबा आणि धनगर आणि मी बघून घेतो.

झरे (सांगली) ः धनगर समाज माझा आहे. बिरोबांची शपथ मी घेतली हे खरेच. पण मी माझा समाज आणि बिरोबा आमचं आम्ही बघून घेतो. माझं काही चुकलं असेल तर बिरोबा बघून घेईल दुसऱ्यांनी त्यात लुडबुड करु नये असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
राष्ट्रवादीचे नेते हणमंतराव देशमुख यांनी श्री पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजप त्याग करतेवेली आरेवाडी येथे बिरोबा बनात घेतलेल्या शपथीची आठवण करून देत टिका केली होती.त्यांना प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी आज प्रत्युत्तर दिले.
आमदार पडळकर म्हणाले,"" तालुक्‍यात किंमत नसलेले नेते माझ्यावरती टीकेची झोड उडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक वेळेस सरड्यासारखे रंग बदलणारे व जनतेची दिशाभूल करणारी ही मंडळी आहेत. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. होय मी बिरोबाची शपथ घेतली होती. तो देव माझा आहे. धनगर समाजही माझा आहे. मी, माझा समज आणि माझा बिरोबा बघून घेईल. माझं काही चुकलं असेल तर माझा समाज आणि माझा बिरोबा मला माफ करणार नाही पण बाकीच्यांनी त्यात लुडबुड करायचं काम नाही.''
ते म्हणाले,"" स्वच्छ प्रतिमा असणाऱ्यांनीच माझ्या विरोधात बोलावे. एका बहाद्दराने आटपाडी तालुक्‍यातून शेअर्स गोळा केले आणि ते हडप केले, तर दुसऱ्याने स्वतःच्या फॅक्‍टरीमध्ये कामगार आणले आणि त्यांना उपाशी मारले. त्यांचे पैसे अडकविले. ही यांची नीतिमत्ता. आणि ते माझ्यावर टीका करतात. उपाशी कामगारांची बिले द्या. त्यांच्यासाठी शिव भोजन थाळी सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यावर दबाव आणतात. ही यांच्या समाजसेवेची पध्दत आहे.''
ते म्हणाले,`` माझ्या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत आहे. धनगर, मराठा, रामोशी व अन्य जातींच्या आरक्षणासाठीही मी आंदोलने केली आहेत. भविष्यातील आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. जरा थांबा. कोरोना संकट जाऊद्या. तुम्ही फक्त कागद-पेन घेऊन माझ्या कामांची यादी करा आणि मग काय करायची ती टीका करा. लेबल एका पक्षाचे काम दुसऱ्या पक्षाचे असा उद्योग मी करीत नाही. तुम्हाला जनतेने जागा दाखवून दिली आहे. स्वप्रसिद्धीसाठी टीका करू नका.''