मंडलिकांना आमची गरज नाही काय? - आमदार क्षीरसागर

मंडलिकांना आमची गरज नाही काय? - आमदार क्षीरसागर

कोल्हापूर - लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशीच जास्त संपर्क आहे. माजी मुख्यमंत्र्यांना घेऊन त्यांनी कार्यक्रमही केला आहे. मंडलिकांना आमची गरज आहे की नाही? अशी विचारणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या बैठकीतच केली. परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे संपर्कमंत्री दिवाकर रावते यांचे पक्षातील खदखदीकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला चांगले वातावरण आहे. पक्षांतर्गत काही चुका दुरुस्त केल्या तर नक्कीच आपला उमेदवार निवडून येईल, असे सांगत पक्षातील मतभेद दूर करण्याची गरज असल्याचेही आमदार क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रावते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. कार्यकर्ते सतर्क आहेत की नाही, याची चाचपणी त्यांनी केली. 

आमदार क्षीरसागर म्हणाले, की आतापर्यंत शिवसेनेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकता आलेली नाही. पण, आपण नेहमीच विजयाच्या जवळपास असतो. यंदा चांगली परिस्थिती आहे. पण, संभाव्य उमेदवार प्रा. मंडलिक यांची शिवसैनिकांपेक्षा दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींकडे जास्त उठबस असते. मध्यंतरी त्यांनी राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांना घेऊन एक कार्यक्रम केला आहे. त्यामुळे एक कट्टर शिवसैनिक म्हणून मला असे वाटते, की मंडलिकांना आमची गरज आहे की नाही? हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही हाडाचे शिवसैनिक असल्याने निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी जीवाचे रान करू. भाजपने पैशांच्या जोरावर का होईना जिल्ह्यात विस्तार वाढविला आहे. गतवेळी विधानसभेला वेगवेगळे लढलो. भाजपच्या उमेदवाराला ४० हजार मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत सतर्क राहण्याची गरज आहे. 

बैठकीला संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

चंदगडमध्ये स्थिती सुधारल्याचा दावा
चंदगड मतदारसंघात शिवसेनेची परिस्थिती सुधारत असली, तरीही अद्याप दहा हजार मते आपल्याला कमी पडतात, असा अंदाज आहे. विकासकामांसाठी निधी दिला तर उर्वरित वेळेत हा गॅप भरून काढू शकतो, असा दावा संग्रामसिंह कुपेकर यांनी केला. संध्यादेवी कुपेकर यांचा, तसेच त्यांच्या कन्या नंदा बाबूळकर यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस तोड उमेदवार हवा, असे म्हणत महिला उमेदवार देता येईल का, याचीही चाचपणी रावते यांनी केली. कुपेकर यांच्या घराणेशाहीलाच लोकांचा विरोध असल्याकडे लक्ष एका कार्यकर्त्याने या वेळी वेधले. संग्रामलाही कशी उमेदवारी द्यायची, असे विनोदाने म्हणत ‘त्या शिवसैनिकाला तू पट्टीचा राजकारणी’ असल्याचा टोला रावते यांनी मारला. यामुळे एकच हशा पिकला. दरम्यान, संग्रामसिंह कुपेकर यांनी चंदगड मतदारसंघाचा आढावा घेतला. टीमवर्कमुळे पक्षाची स्थिती तेथे सुधारल्याचा दावा त्यांनी केला.

हातकणंगलेबाबत चर्चा थांबविली
हातकणंगले मतदारसंघातील परिस्थिती सांगताना आमदार सुजित मिणचेकर आणि तालुका पदाधिकारी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मिणचेकर यांनी ‘बीएलओ’बाबत मी आमदार असूनही काही माहिती नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला; तर पदाधिकाऱ्यांनी आमदार फोनच डायव्हर्ट करीत असल्याचे सांगितले. दिवाकर रावते यांनी हा विषय थांबवत जादा चर्चा केली नाही.

राधानगरीत फक्त विधानसभेतच धनुष्यबाण
राधानगरी विधानसभा मतदारसंघात केवळ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतच धनुष्यबाण दिसतो. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत येथे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात नाहीत. त्यामुळे याकडे स्थानिक आमदारांना पक्षाने सूचना देऊन निवडणुका चिन्हावर लढवायला हव्यात, अशी स्पष्ट भूमिका एका पदाधिकाऱ्याने मांडली.

कागलमध्ये शिवसेना भक्कम
शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व संजय घाटगे यांच्यामुळे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय निश्‍चित असल्याचा दावा कागल येथील एका पदाधिकाऱ्याने केला. स्थानिक आमदार मुश्रीफ यांच्या नाराजीचाही फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

दक्षिणेत परिस्थिती काय?
कोल्हापूर दक्षिणमध्ये परिस्थिती काय? असा प्रश्‍न रावते यांनी विचारताच आजवर हा मतदारसंघ भाजपकडे होता. मतदारसंघात काँग्रेस व भाजपचे दोन्ही उमेदवार मातब्बर आहेत. त्यामुळे तेथे ताकदीचा उमेदवार द्यावा लागेल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगताच देवणे यांनी गतवेळी तेथील उमेदवारी मागितली होती. पण, त्यांना कमी मते का मिळाली, असे रावते यांनी विचारताच गतवेळी कमी वेळ मिळाल्याचे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

कर्जमाफी परत गेल्याचा संजय मंडलिकांना फटका 
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, की करवीर मतदारसंघात नेहमीच काट्यावरची लढाई असते. पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षांतर्गत मतभेद जरुर आहेत. पण, मी कोणावर चूक ढकलणार नाही. साखर कारखानदारी, ‘गोकुळ’चे राजकारण याचेही पडसादही या मतदारसंघावर पडत असतात. गतवेळी लोकसभेचे उमेदवार प्रा. मंडलिक यांना ३४ हजार मते कमी पडली, याची कारणेही तशीच आहेत. कर्जमाफीच्या विरोधात तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी बंड केले होते. ही कर्जमाफी २०१४ च्या निवडणुकीवेळी परत गेली. माझ्या मतदारसंघातील नऊ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी परत गेली. त्याचा फटका प्रा. मंडलिकांना बसला. पण, या वेळी वातावरण चांगले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com