आमदार क्षीरसागर म्हणाले,...तर निवडणूक रिंगणातून माघार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - "दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले.

कोल्हापूर - "दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले. 

शहर शिवसेनेतर्फे झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव महाराज अध्यक्षस्थानी होते.  आमदार क्षीरसागर यांच्या कार्य अहवालाचे यावेळी प्रकाशन झाले.  

श्री. क्षीरसागर म्हणाले, मी तिसऱ्यांदा विजयी होणार यात कोणतीही शंका नाही. मी केलेल्या कामाच्या दहा टक्के काम केल्याचे कुणीही सांगावे. तसे झाल्यास मी निवडणूक रिंगणातून माघार घेतो. येत्या निवडणुकीसाठी आणखी एक घोसाळकर इच्छुक आहेत. दहा वर्षात प्रत्येक प्रश्‍नात सहभाग दिला. 2009 ला माझी उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी मी प्रतिस्पर्धी उमेदवाराला बाय दिले, असे सांगितले गेले. प्रत्यक्षात विजयी मीच झालो. राज्यस्तरावर युतीच्या मंत्र्यांनी चांगले काम केले. उद्योगमंत्र्यांनी विविध परवान्यांची संख्या कमी केली. पुराच्या काळात मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे काम केले. विधानसभा निवडणुकीत युती होणार हे नक्की आहे. 

खासदार मंडलिक म्हणाले, शहर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातून 27 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. आता राजेश क्षीरसागर यांना पन्नास हजारांचे मताधिक्‍य दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. शिकार वाघाची असो अथवा सश्याची तयारी ही करावीच लागते. निवडणुकीत गाफील न राहता शिवसैनिकांनी कामाला लागावे. भावी कॅबिनेट मंत्र्यांला आपण मतदान करणार आहोत, हे ध्यानात असू दे, 
आजच मोठ्या इर्षेने निर्धार करा, की शहराचे प्रतिनिधी हे क्षीरसागरच असतील. ईएसआय रुग्णालयाच्या प्रश्‍नावर नुकतीच केंद्रीय समिती येऊन गेली. एक डिसेंबरपर्यंत रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि सहा आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत दहाच्या दहा आमदार युतीचे कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करूया. 

रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक सुनील मोदी, नियाज खान, ऋतुराज क्षीरसागर, राहूल चिक्कोडे, विशाल देवकुळे यांनी मनोगत व्यक्त केले. अंकुश निपाणीकर यांनी सुत्रसंचालन केले. 

अवैध व्यवसाय चालू देणार नाही 
श्री. क्षीरसागर म्हणाले, टोलचा प्रश्‍न, एलबीटी, तीर्थक्षेत्र विकास आराखडा अश्या प्रश्‍नात लक्ष दिले. हैदराबादच्या हुसेन सागर तलावाच्या पार्श्‍वभूमीवर रंकाळ्याचे सौदर्यीकरण, शाहू मिलच्या जागेत छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक तसेच गारमेंट उभारण्याचे स्वप्न आहे. शहराला जोडणारे राज्यमार्ग चारपदरी व्हावेत यासाठी प्रयत्न असणार आहेत. शहरात भविष्यात अवैध व्यवसाय आपण चालू देणार नाही. 

ठरलंयं नक्की, हॅट्रिक नक्की 
ठरलयं नक्की, हॅट्रिक नक्की असे सांगत कोल्हापुरला भगवाच उत्तर हवं आहे, अशा आशयाच्या स्लोगन तयार केल्या. उपस्थितांनी ठरलंयं नक्की, हॅट्रिक नक्की अशा घोषणा दिल्या. 

खासदार प्रा. संजय मंडलिक, कोल्हापूर उत्तरचे शहरप्रमूख रविकिरण इंगवले. गटनेता नियाज खान, नगरसेवक राहूल चव्हाण, वैशाली क्षीरसागर, नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर, रवि चौगले, सदानंद कोरगांवकर, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rajesh Kshirsagar comment