राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार; कुपेकरांचा निर्णय रविवारी

राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार; कुपेकरांचा निर्णय रविवारी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की अन्य पर्यायांचा विचार करायचा याचा आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा फैसला रविवारी (ता. १५) मुंबईत होणार आहे. पक्षाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी श्रीमती कुपेकर यांना भेटीची वेळ दिली आहे. या भेटीतच हा निर्णय होणार आहे. 

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवार यांच्याशी निष्ठावंत घराणे अशी कुपेकर यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी ज्यांनी श्री. पवार यांना साथ दिली, त्यापैकी एक म्हणजे कै. बाबासाहेब कुपेकर. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी कुपेकर हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते; पण त्यांनी श्री. पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेऊन या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कुपेकर हेच राष्ट्रवादीचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले. त्यांच्या निधनानंतर चंदगड विधानसभेच्या दोन निवडणुकीत (एक पोटनिवडणूक) श्री. पवार यांनी श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी दिली. 

विधानसभा निवडणुकीत आपण लढणार नसल्याचे श्रीमती कुपेकर यांनी जाहीर केले आहे. पक्षाकडे त्यांनी उमेदवारीही मागितलेली नाही. त्यांच्याऐवजी कन्या सौ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव उमेदवारीच्या चर्चेत आहे. तथापि, त्या राष्ट्रवादीऐवजी भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत. त्यातून कुपेकर गट भाजपत जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे; पण चंदगडची जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्याने त्यावर निर्णय झाला नव्हता. आता मात्र रविवारी (ता. १५) राष्ट्रवादीत राहायचे की पक्ष सोडायचा याचा निर्णय श्रीमती कुपेकर यांच्याकडून होणार आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष श्री. पवार यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. रविवारी मुंबईत ही भेट होणार आहे. तत्पूर्वी, श्रीमती कुपेकर यांच्याकडून कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. या संवादातून जो निर्णय पुढे येईल तो त्या श्री. पवार यांच्या भेटीत सांगणार आहेत. सद्यस्थितीत त्या राष्ट्रवादी सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांच्या कन्या सौ. बाभूळकर ह्या भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 

रविवारी निर्णयच होईल : नंदिनी  बाभूळकर
यासंदर्भात नंदिनी बाभूळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘श्री. पवार यांनी रविवारी भेटीची वेळ दिली आहे. तत्पूर्वी, दोन दिवस श्रीमती कुपेकर यांच्याकडून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. कार्यकर्त्यांच्या ज्या भावना येतील त्या श्री. पवार यांच्यासमोर सांगितल्या जातील. त्यामुळे रविवारीच राष्ट्रवादीत राहायचे की पक्ष सोडायचा याचा निर्णय होईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com