ठरले! शिवेंद्रसिंहराजे भाजपात जाणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

उदयनराजे विधानसभा निवडणुकीत आपल्याला धोका पोहोचवू शकतात, याचा अंदाज बांधत शिवेंद्रसिंहराजे कमळाच्या प्रेमात पडले आहेत.

सातारा : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत धोका होण्याची शक्यता असताना तसेच पक्ष नेतृत्वाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात आज (गुरुवार) तोंड फुटले आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावले टाकली असून लवकरच याबाबतची घोषणा भाजपकडून होणार आहे.  

उदयनराजे विधानसभा निवडणुकीत आपल्याला धोका पोहोचवू शकतात, याचा अंदाज बांधत शिवेंद्रसिंहराजे कमळाच्या प्रेमात पडले आहेत. आगामी आठवड्याच्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज (गुरुवार) शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीच्या मुलाखतीला उपस्थित राहिले नाहीत, यावरून भाजपचे नेते शेखर चारेगावकर यांनी शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रथमच कराडमध्ये मत व्यक्त केले आहे. 

सातारा, कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात ताकत असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे येथील राष्ट्रवादीचे दोन आमदार सहज निवडून येत होते, पण त्यांच्या या ताकतीचा राष्ट्रवादीकडून कधीच सन्मान झाला नाही. कायम त्यांना डावलले गेले. राष्ट्रवादीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आजपर्यंत साधे राज्यमंत्रीपद देखील दिलेले नाही, ही चरेगावकरांचा प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादीतील नेत्यांवर नाराज आहेत. सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पक्षाने तिकीट देऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, जनतेची नाडी जाणणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांनाच तिकीट देऊन खासदार केले. केवळ शरद पवार यांच्या शब्दाला मान देऊन शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा मतदारसंघात पक्षाचे काम केले, पण निवडणूक होऊन महिना होतोना तोच मूळ भूमिका धारण केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA ShivedrasinghRaje Bhosale will enter into BJP