आमदार सिद्धराम म्हेत्रेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

प्रशांत देशपांडे
रविवार, 14 जुलै 2019

सोलापूर : अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित झाला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल, असा खुलासाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज (रविवार) 'सकाळ'शी बोलताना केला. त्यांच्या सोबत जिल्ह्यातील आणखी आजी-माजी आमदार, तालुकाध्यक्ष संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. वेळ आल्यावर पक्षातील वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेऊन त्यांची नावे जाहीर करतील, असेही देशमुख यांनी सांगितले. 

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोंडींना वेग आला असून जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह काँग्रेसचे आजी-माजी आमदार भाजपच्या संर्पकात असल्याचा दावा देशमुख यांनी केला.

भाजपमध्ये आयारामांची संख्या वाढत असल्याने पक्षाची बदनामी होत असून यापुढे कोणालाही पक्षात घेतले जाणार नाही, असे वक्‍तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र, त्याला बगल देत भाजपमधील इनकमिंग सुरुच राहील, असे सहकारमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केल्याने पक्षाअंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येते. 

भाजप अन्‌ आरएसएसची विचारसरणी रुजवू 
एखादा नेता कोणत्याही राजकीय पक्षातील असेल अन्‌ त्याला भाजपमध्ये यायचे झाल्यास त्याला पक्षात घेतले जाईल. नेता आमच्या पक्षात आला, तर आम्हाला काहीच अडचण नाही. दगडाची मूर्ती बनविण्याचे काम आम्ही करू. त्यांना आम्ही भाजपची विचारसरणी आणि राष्ट्रीय स्वयंसवेक संघाची विचारसारणी समजवून सांगण्याचे काम करणार आहोत. त्या पद्धतीनेच त्यांच्याकडून काम करून घेतले जाणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Siddharama Mhetre enter into BJP