'वेळ पाहून' घड्याळ ठेवणार बाजूला - आमदार वैभव पिचड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

"राष्ट्रवादी'च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकोले तालुकाध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, महिलाध्यक्ष, युवक अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे पाठवल्याचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी सांगितले.

अकोले - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ "राष्ट्रवादी'चे आमदार वैभव पिचड यांनीही "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकण्याचा आणि घड्याळ काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे; मात्र याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शनिवारी) तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार असल्याचे पिचड यांनी आज येथे स्पष्ट केले. वैभव यांचे वडील मधुकर पिचड यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासह आघाडी सरकारमध्ये अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगल्यानंतर पक्षाला रामराम ठोकण्याचा त्यांचा निर्णय "राष्ट्रवादी'ला मोठा धक्का मानला जात आहे. पिचड यांनीच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज याबाबत माहिती दिली.

पिचड म्हणाले, 'चांगले काम करताना आपल्या पुढच्या पिढीनेही चांगले काम करावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी 40 वर्षे तालुक्‍यातील रस्त्यांची, धरणांची आणि एकूणच विकासाची कामे करत तालुक्‍याची बांधणी केली. मात्र या पाच वर्षांत कोल्हार-घोटी राज्यमार्गासह सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली. विरोधी आमदार असल्याने विकासकामांना निधी मिळत नाही. त्यामुळे हा पाच वर्षांचा अनुभव पाहता सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढच्या काळात आपल्याला काही तरी निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही मागणी होती.''

आपण गेली पाच वर्षे सत्तेत नसल्याने तालुक्‍यातील पाणी पळवून नेले. निसर्गनिर्मित नाही, तर मानवनिर्मित दुष्काळाला सामोरे जावे लागले. "पिंपळगाव खांड'चेही पाणी पारनेरला नेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात इतर तालुक्‍यांत कोट्यवधी रुपयांचा निधी, तर आपल्या तालुक्‍याला लाखात निधी मिळाला. त्यामुळे भविष्यात तालुका विकासापासून दूर राहून उद्‌ध्वस्त होऊ नये, म्हणून तत्त्व बाजूला ठेवून, हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे.
- आमदार वैभव पिचड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Vaibhav Pichad NCP Shivsena Politics