कडेगाव तालुक्‍यात टोल नाका होऊ देणार नाही - आमदार विश्वजित कदम

कडेगाव तालुक्‍यात टोल नाका होऊ देणार नाही - आमदार विश्वजित कदम

कडेगाव - कडेगाव तालुक्‍यात शिवणी फाटा ते येवलेवाडी दरम्यान गुहागर-विजापूर (166 ई) या राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका उभारण्याच्या हालचाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सुरू केल्या आहेत. "कडेगाव तालुक्‍यात येतेय टोल' धाड' असे वृत्त "सकाळ' ने सिद्ध केले. त्याची दखल घेत आमदार विश्वजित कदम यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून कडेगाव तालुक्‍यात कुठेही टोल नाका होऊ देणार नाही अशी ठोस भूमिका मांडली. 

कडेगाव व विटा ही दोन शहरे गुहागर-विजापूर महामार्गावर येतात. येथे होत असलेल्या टोलनाक्‍यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना शासकीय कामे व शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी कडेगाव व विटा येथे जावे लागते. टोलनाका झाल्यास त्यांना सतत टोल द्यावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व स्तरातून टोल नाक्‍याला विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे टोलनाका होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. 

दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गुहागर-विजापूर (166 ई) हा 283.080 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. 1474.89 कोटींची तरतूदही केली. सध्या महामार्गाचे कामही सुरू झालेय. त्यामुळे दुष्काळी भाग कोकण व कर्नाटकशी जोडला जाणार आहे. रस्ता दर्जेदार होत आहे. महामार्गामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होऊन दुष्काळी भागाचा कायापालट होईल. 

दरम्यान, शिवणी फाटा ते येवलेवाडी दरम्यान टोल नाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निधीची तरतूदही महामार्गाच्या कामाच्या निधीत करण्यात आली आहे. कडेगाव ते विटा दरम्यान महामार्ग उभारणीचे काम करणारी एजन्सीच हा टोलनाका उभारणार आहे. आता भूसंपादनही करण्यात येणार आहे.

या महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनाला "टोल' द्यावा लागेल. स्थानिक नागरिकांना या महामार्गावरून सतत ये-जा करावी लागणार असल्याने त्यांनाही टोलनाक्‍याचा भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळेच नागरिकांचा टोलनाक्‍याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे टोल नाका रद्द करावा, अशी मागणी जोर धरून लागली. त्याला अनुसरून आमदार विश्वजित कदम यांनी पावसाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा घडवून आणली. कडेगाव तालुक्‍यात टोल नाका होऊ देणार नाही, अशी ठोस भूमिका घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com