Vidhan Sabha 2019 : मनसेच्या इंजिनला दोन उमेदवारांचा चकवा

तात्या लांडगे
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

माळशिरसचे उमेदवार मनिषा करचे व सांगोल्याचे उमेदवार जयवंत बगाडे यांनी उमेदवारी मागे घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चकवा दिला आहे.

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोलापुरात पाच उमेदवार
दिले मात्र, त्यापैकी माळशिरस व सांगोला विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना काहीच न सांगता परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. माळशिरसचे उमेदवार मनिषा करचे व सांगोल्याचे उमेदवार जयवंत बगाडे यांनी उमेदवारी मागे घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चकवा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला. त्यानुसार सोलापुरातील पाच उमेदवार उभे करण्याचा निर्णयही झाला आणि त्यानुसार मोहोळमधून डॉ. हणुमंत भोसले, अक्‍कलकोटमधून मधुकर जाधव, बार्शीतून नागेश चव्हाण तर सांगोल्यातून जयवंत बगाडे आणि माळशिरसमधून मनिषा करचे यांना उमेदवारी मिळाली. काहीही झाले तरी मनसेचे पाच उमेदवार निवडणूक लढणारच असे जाहीर करणाऱ्या मनसेला दोन उमेदवारांनी धक्‍का दिला. दरम्यान, माळशिरसमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमदेवार उत्तमराव जानकर यांना फायदा व्हावा आणि सांगोल्यात शेकापच्या उमेदवाराला मदत मिळावी या उद्देशाने ही माघार असल्याची चर्चा आहे. परंतु, याबाबत मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांना काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे.

आता यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे मात्र, तत्पूर्वी त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांचा झेंडा हाती घेऊन प्रचार सुरु केल्याचीही चर्चा आहे.

महायुतीचे पदाधिकारी वंचितच्या प्रचाराला 

भाजप- शिवसेना युतीनंतर मित्रपक्षालाही जागा मिळाल्या. त्यामध्ये रयतक्रांतीला तीन तर रिपाइंला सहा जागा मिळाल्या. मात्र, सोलापुरातील रयतक्रांतीच्या अक्‍कलकोट व पंढरपूर- मंगळवेढ्याच्या जागेवर आणि रिपाइंला मिळालेल्या माळशिरसच्या जागेवरही भाजपचाच उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करुनही कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही आणि भाजपच्याच उमेदवारांना त्याठिकाणी उमेदवारी देण्यात आली. त्यावरुन व्यथित झालेले रयतक्रांती आणि रिपाइंचे पदाधिकारी वंचित बहूजन आघाडीसह अन्य पक्षातील उमेदवारांच्या वळचणीला गेल्याची चर्चा आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराकडे त्यांनी पाठ फिरवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS candidates Withdrawn their Candidacy from Election