मोबाइल ऍप रोखणार निवडणुकीतील गैरप्रकार 

मोबाइल ऍप रोखणार निवडणुकीतील गैरप्रकार 

कोल्हापूर - निवडणूक काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने "कॉप' (सिटिझन ऑन पेट्रोल) आणि मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी "ट्रू व्होटर ऍप' (टीव्हीए) हे दोन नवीन ऍप्स विकसित केले आहेत. कॉपच्या माध्यमातून नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी थेट नोंदवता येणार आहेत. तसेच मतदारांना मतदान विभाग, प्रभाग, मतदार यादी क्रमांक, बूथ क्रमांक, ठिकाणे आदी तपशीलदेखील समजणार आहे. 

निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना पैसे वाटणे, वस्तूंचे वाटप आदी प्रकार मते मिळविण्यासाठी करण्यात येतात. वेगवेगळी आमिषे दाखवून मतदार पळविण्याचेही कारस्थान केले जाते. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप करून आचारसंहितेचाही भंग करण्याचे प्रकार घडतात. अशा गैरप्रकारांना टाळण्यासाठी आता निवडणूक आयोगाने ऍप विकसित केले आहे. 

"कॉप'चा मुख्य उद्देश निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणे हा आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिक सुलभपणे या ऍपद्वारे दाखल करू शकणार आहेत. काहीही गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तत्काळ तक्रारही नोंदविण्यात येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवालही तक्रारदारास ऍपवरच पाहायला मिळणार आहे. निवडणूक संनियंत्रण समिती या तक्रारीच्या आधारे संबंधितांवर कारवाईही करण्यात येणार आहे. 

मतदारांच्या प्रबोधनासाठी आयोगाने विकसित केलेल्या टीव्हीए या ऍपद्वारे मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्रमांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणे, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणे, मतदानाबाबतची माहिती घेणे, स्वत:ची माहिती छायाचित्रासह अद्ययावत करणे, सोबत आधार तसेच मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणे, कुटुंब व मित्रांचा गट तयार करणे, गैरहजर, स्थलांतरित, मृत व बोगस मतदारांना चिन्हांकित करून कळविणे, स्वत:चे मत सिक्‍युरिटी प्रश्‍नाद्वारे सुरक्षित करणे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्रमांक जतन करणे, तसेच एकाच मोबाइलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्‍य आहे. निवडणुकीचा निकाल पाहणे हेदेखील या ऍपमुळे सुलभ होणार आहे. 

"कॉप'चा इथे होऊ शकतो वापर 
कॉप (सिटिझन ऑन पेट्रोल) च्या माध्यमातून मतदारांना पैसे, भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप, मद्य वाटप, बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आदी शस्त्रांचे वाटप, घोषणा व जाहिराती, बॅनर, फलक, पोस्टर, होर्डिंग, सरकारी गाड्यांचा गैरवापर, इलेक्‍ट्रॉनिक मीडिया, पेड न्यूज, सोशल मीडिया, प्रचार रॅली, मिरवणुका, सभा, प्रार्थनास्थळाचा वापर, लहान मुलांचा वापर, प्राण्यांचा वापर, भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभ, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर, प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वास्तव्य करणे, मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापर आदी गैरप्रकार रोखण्यासाठीच हे ऍप वापरता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com