मोलकालमुरू साडीचा उपयोग करून आधुनिक ड्रेसेस

मोलकालमुरू साडीचा उपयोग करून आधुनिक ड्रेसेस

इचलकरंजी - येथील ‘डीकेटीई’मधील अंतिम वर्ष फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीचा उपयोग करून भारतीय व पाश्‍चिमात्य पद्धतीचा मेळ घालत आधुनिक ड्रेसेस तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नावीन्यपूर्ण पारंपरिक व आधुनिक डिझाईनचे ड्रेसेस विकसित होत आहेत.

सध्याची तरुणाईला इंडोवेस्टर्न कपड्यांची भुरळ पडली आहे. इंडोवेस्टर्न कपड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये पारंपरिक मोलकालमुरु सिल्क साडीचा वापर करून नवनवीन आधुनिक वस्त्र प्रावरणांचे कलेक्‍शन तयार केले आहे. या कलेक्‍शनमध्ये क्रॉप टॉप विथ पलाजो, जंप सूट विथ केप, वनसाईडेट रुफेल्स टॉप, वन पीस विथ बॉक्‍स प्लीट असे लेडीज विअर आणि वेस्टर्न मेन्स कुर्ता असे ५ ड्रेस तयार केले आहेत. हा प्रकल्प हॅंडलूम कापडावर आधारित असल्यामुळे हॅंडलूम उद्यागाला ऊर्जितावस्था मिळालेली आहे. यातून अनेक हातांना काम मिळणार आहे. त्याचबरोबर हॅंडलूम इंडस्ट्रीज आधुनिक कपड्यांच्या बाजारपेठेत प्रवेश करेल. 

सिल्कला त्याच्या सुंदर दिसण्यामुळे कपड्यांची राणी असे संबोधले जाते. मोलकालमुरु सिल्कचा अजूनपर्यंत साडी शिवाय अन्य वापर झालेला नाही. आजकाल इंडोवेस्टर्न कपडे वापरणे सर्वजण पसंत करतात. 

या सर्व गोष्टींचा विचार करून ‘डीकेटीई’तील शिवतेज गस्ती, एकता बडवे, पूर्वा सोलकण पाटील, निकिता झरकर व मंजुश्री काळे या विद्यार्थ्यांनी प्रा. एल. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोलकालमुरू सिल्क साडीची निवड केली. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील व विभागातील सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. 

काय आहे मोलकालमुरू?
मोलकालमुरू हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग जिल्ह्यात असून, येथील बहुतांश नागरिक पारंपरिक सिल्क साडी बनविण्याच्या व्यवसायात अग्रेसर आहेत. त्यामुळे येथील मोलकालमुरू साडी प्रसिद्ध आहे. ही साडी गोळा होत नाही व कडक राहते. आकर्षक रंग, मनाला भुरळ घालणारे डिझाईन तसेच या साडीच्या काठातील मंदिरांचे डिझाईन हे याचे वैशिष्ट्य आहे. मोलकालमुरू साडीचा अगदी नवीन प्रकार म्हणजे बुट्टा साडी. बुट्टा साडी डॉबी लूम्सवर पारंपरिक तसेच कॉम्प्युटराइज्ड डिझाइनचा वापर करून विणल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com