मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करणार - नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मोहोळ - मोहोळ येथे मंगळवारी झालेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मोहोळला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांना तपासासाठी सूचना दिल्या. या घटनेत मृत पावलेल्या अबू कुरेशी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य त्या मदतीसाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

मंगळवारी रात्री एका दरोड्यातील आरोपींना पकडण्यासाठी मोहोळ येथील शिवाजी चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने व्यूहरचना केली होती. त्या वेळी आरोपींना पकडताना झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांच्या मदतीला धावून गेलेल्या अबू कुरेशी यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी होऊन मृत पावले. घटनेची चौकशी करण्यासाठी नांगरे-पाटील यांनी आज मोहोळला भेट दिली. त्यांनी मृत कुरेशी यांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. त्यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या घटनेत जे पोलिस कर्मचारी जखमी झाले त्यांना रिवॉर्डसाठी शासनाकडे शिफारस करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. मृत कुरेशी यांच्या वारसांना मदतीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहोळ येथे ठाण मांडून आहेत.

Web Title: mohol news solapur news death relative help vishwas nangare patil