प्रेमी युगुलांना निर्जनस्थळी लुटणाऱ्या टोळीवर मोकातंर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

टोळीचा म्होरक्‍या आप्पा ऊर्फ सुभाष नामदेव माने (रा. तामशिडवाडी, ता. माळशिरस, सोलापूर), सचिन बलभीम कारंडे, शहाजी बबन लोखंडे (दोघे रा. शिखर शिंगणापूर, ता. माण, सातारा) आणि दादासाहेब तात्याबा कडोलकर (रा. मारकरवाडी, माळशिरस, सोलापूर) अशी मोकातंर्गत कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

कोल्हापूर - भाविकांना व प्रेमी युगुलांना निर्जनस्थळी लुटणाऱ्या आप्पा मान्या टोळीतील चौघांवर मोकातंर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. यात टोळीचा म्होरक्‍या आप्पा ऊर्फ सुभाष मानेसह चौघांचा समावेश आहे. या टोळीवर जबरीचोरी, खंडणीसाठी अपहरण, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

यांच्यावर मोकातंर्गत कारवाई

टोळीचा म्होरक्‍या आप्पा ऊर्फ सुभाष नामदेव माने (रा. तामशिडवाडी, ता. माळशिरस, सोलापूर), सचिन बलभीम कारंडे, शहाजी बबन लोखंडे (दोघे रा. शिखर शिंगणापूर, ता. माण, सातारा) आणि दादासाहेब तात्याबा कडोलकर (रा. मारकरवाडी, माळशिरस, सोलापूर) अशी मोकातंर्गत कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती

आप्पा मान्या टोळीचा म्होरक्‍या संशयित आप्पा ऊर्फ सुभाष माने हा साथिदार सचिन कारंडे, शहाजी लोखंडेसह दादासाहेब कडोलकरच्या मदतीने कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, पुणे, मुंबई आदीसह राष्ट्रीय महामार्ग, पर्यटनस्थळ व तीर्थस्थळावरील भाविक व प्रेमी युगुलांना लक्ष करून त्यांना लुटत होते. या टोळीवर कोडोली पोलिस ठाण्याने कारवाई केली. या टोळीविरोधात दहा वर्षांत खून, जबर दुखापतीचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण, चोरी, दुखापत असे 20 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती कोडोली पोलिस ठाण्याच्या तपासात पुढे आली.

बनसोडे यांनी तयार केला प्रस्ताव

त्यानुसार या टोळीवर मोकातंर्गत कारवाईचा प्रस्ताव सहायक पोलिस निरीक्षक बनसोडे यांनी तयार केला. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. वारके यांच्याकडे पाठवला. त्या प्रस्तावास डॉ. वारके यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आप्पा मान्या गॅंगमधील चौघा संशयितांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला. मोकाअंतर्गत गुन्ह्याचा तपास शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक अनिल कदम हे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moka Action Against Gang Looting Lovers Couples In Deserted Place