इचलकरंजीतील इराणी टोळीला मोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

इचलकरंजी - आंबीवल्ली (कल्याण) येथील सोनसाखळी चोरणाऱ्या नामचीन ‘इराणी’ टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाई केली असून कारवाईचा प्रस्ताव अवघ्या चार दिवसांत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

इचलकरंजी - आंबीवल्ली (कल्याण) येथील सोनसाखळी चोरणाऱ्या नामचीन ‘इराणी’ टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाई केली असून कारवाईचा प्रस्ताव अवघ्या चार दिवसांत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

श्री. घाडगे व श्री. पिंगळे म्हणाले, ‘‘इराणी टोळीविरोधी सोनसाखळी, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, मोटारसायकल चोरी असे मुंबई, भिवंडी, कल्याण, जयसिंगपूर, पेठवडगाव, गावभाग (इचलकरंजी) पोलिस ठाण्यात सुमारे १७ गुन्हे नोंद आहेत. म्होरक्‍या हैदर सरताज इराणी (इराणी मस्जिद जवळ, जयसिंगपूर, ता. शिरोळ) आहे. टोळीने दहा दिवसांपूर्वी किणी, वड्डवाडी (ता. हातकणंगले) येथील माधुरी विशाल पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे चार तोळ्यांचे गंठण, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा मारून पलायन केले होते.

येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी यांच्या पथकाने सहा दिवसांपूर्वी टोळीचा छडा लावून, गुन्हेगार हैदर इराणी याचा साथीदार असगर ऊर्फ बंटी इजाज इराणी (वय २४, रा. इराणी मस्जिद जवळ, जयसिंगपूर, ता. शिरोळ) याला अटक केली. टोळीच्या गुन्हेगारी कारनाम्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस उपअधीक्षक श्री. पिंगळे यांनी मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. तो तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करून अंतिम मंजुरीकरिता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करून कुख्यात इराणी टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

जिल्ह्यातील बारावी कारवाई
विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. नांगरे-पाटील यांनी कुख्यात इराणी या सोनसाखळी टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला जी मान्यता दिली, ती जिल्ह्यातील मोकांतर्गतची बारावी कारवाई आहे, अशी माहिती श्री. घाडगे व श्री. पिंगळे यांनी दिली.

Web Title: Moka to Irani Gange in Ichalkaraji