इचलकरंजीतील "मन्या- विक्‍या" टोळीवर मोका अंतर्गत कारवाई

इचलकरंजीतील  "मन्या- विक्‍या" टोळीवर मोका अंतर्गत कारवाई

इचलकरंजी - कुख्यात पिस्तूल तस्कर मनिष रामविलास नागोरी व सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास रामअवतार खंडेलवाल यांच्या "मन्या- विक्‍या" टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर कांही दिवसांपूर्वीच अपहरण करुन खंडणीचा गुन्हा नोंद झाला होता. टोळीमध्ये पाचजणांचा समावेश असून यापैकी दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. 

याबाबतची माहिती आज अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक ईश्‍वर ओमासे उपस्थित होते. 

श्री.घाडगे यांनी दिलेली माहिती अशी, मनिष नागोरी हा कुख्यात पिस्तूल तस्कर आहे. तर विकी खंडेलवाल हा सराईत गुन्हेगार आहे. दोघांवर इचलकरंजी, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, शिरोली, कोल्हापूर, सातारा, पुणे आदी शहरातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. नागोरी हा 22 ऑगष्ट रोजी कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्यांने खंडेलवाल याच्याशी संपर्क साधला. दोघांनी यड्रावफाटा येथे एका पान टपरीवर बसून खंडणीसाठी अपहरणाचा कट रचला. 

खंडेलवाल यांने साथीदार व अनेक गुन्हे दाखल असलेला हर्षवर्धन शाहू घोरपडे (रा. राधाकृष्ण कॉलनी) याच्याशी संपर्क केला. त्यानंतर या टोळीने श्रीनाथ आदिनाथ लोले (वय 25, रा. गणेशनगर) व त्यांचा दिवाणजी संजय श्रीकांत सिंगी (रा. मंगलमूर्ती चित्रमंदिरजवळ) यांचे 12 सप्टेंबररोजी रात्री जूने बसस्थानक परिसरातून अपहरण केले.

अलायन्स हॉस्पीटल परिसरात आणल्यानंतर त्यांच्याकडे पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली. त्यापैकी 50 हजार रुपये वसूल करण्याबरोबरच लोले यांची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. उर्वरीत रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कोले यांनी शिवाजीनगर पोलीसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी खंडेलवाल व घोरपडे यांना अटक केली. तर मंदार घोरपडे, अरुण कोळी यांच्यासह अन्य एक अनोळखी पसार झाला आहे. 

संघटीतपणे या टोळीकडून अनेक गुन्हे करण्यात येत असल्याचे पुढे आल्यानंतर त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव पोलीस अधिक्षकांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकणातील उर्वरीत संशयितांचा शोध सुरु असून लवकरच त्यांना मुसक्‍या आवळणार असल्याचे श्री.घाडगे यांनी यावेळी सांगितले.

आणखी दोन टोळ्या रडारवर
इचलकरंजीसह परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत धडक कारवाई सुरुच आहे. आतापर्यंत 18 गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अद्यापही दोन टोळ्या कारवाईच्या रडारवर असल्याचे श्री. घाडगे यांनी सांगितले.

पिस्तूल खरेदीदारांची चौकशी होणार
पिस्तूल तस्कर नागोरी यांने शहरातील अनेकांना पिस्तूलची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. नागोरी याला पकडल्यानंतर संबंधितांवर चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com