पिंपळवाडीच्या टोळीस मोका

पिंपळवाडीच्या टोळीस मोका

सांगली - कवठेमहांकाळ पोलिसांच्या हाताला हिसडा मारून बेडीसह पळून गेलेल्या कुख्यात गुंड अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर (रा. पिंपळवाडी, कवठेमहांकाळ) याच्यासह सोळा जणांवर मोकाअंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. माजी सरपंच रमेश खोत याची पत्नी छाया ऊर्फ पल्लवी (वय ३५) हिचाही त्यात समावेश आहे. टोळीविरोधात तब्बल १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या दणक्‍याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. 

मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये संशयित संतोष आटपाडकर, उमेश जालिंदर नरळे, संतोष गोपीनाथ खोत, बापू उर्फ सुनील रघुनाथ नरळे, पिंटू उर्फ सीताराम कोंडिबा बजबळे, धनाजी ऊर्फ बंडू सदाशिव माळी, हंबीरराव ऊर्फ बाळू विलास खोत, सुनील यलाप्पा लिंगले, विनोद विलास पाटील, योगेश अशोक खोत, महेश जालिंदर खोत, अमित गणपती नाईक, रवींद्रनाथ काशीनाथ जाधव, संतोष महादेव खोत (सर्व ता. कवठेमहांकाळ) यांचा समावेश आहे. संतोष आटपाडकरने कवठेमहांकाळ तालुक्‍यात संघटित गुन्हेगार टोळी केली होती. टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारामारी, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर १६ गुन्हे दाखल आहेत. 

आटपाडकरला चार एप्रिलला एलसीबी पथकाने अटक केली होती. कवठेमहांकळ पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याला ताब्यात घेतले. त्याचदिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयातून पोलिस नेत होते. त्यावेळी हाताला हिसडा मारून तो बेडीसह पळून गेला. कवठेमहांकाळ पोलिसांनी आनेवाडी (ता. सातारा) येथे सापळा रचून अटक केली. आटपाडकरला मदत करणारे छाया खोत, संतोष खोत, पिंटू खोतला अटक केली होती. 

टोळीतील गुन्हेगारांचे कारनामे पाहता सोळा जणांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमअंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली आहे. प्रक्रियेत एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, अप्पासाहेब कोळी, सिद्धाप्पा रूपनर, विशाल भिसे, गजानन बिराजदार यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com