खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकला मोका

खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकला मोका

कोल्हापूर - बेकायदा खासगी सावकारीसह भूखंड माफीयाची टोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकच्या ‘एसएस गॅंग’वर मोकाअंतर्गत कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी गॅंगविरोधात दिलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानुसार साखरे, महाडिकसह सात जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. यादवनगरातील संशयित सलीम मुल्लाच्या गॅंगनंतर महिन्याभरातील मोकाअंतर्गत ही दुसरी कारवाई ठरली. 

मोकाअंतर्गत कारवाईतील संशयितांमध्ये सूरज हणमंत साखरे (वय २८, रा. कॅशप हाईट अपार्टमेंट, देवकर पाणंद), अभी ऊर्फ युवराज मोहन महाडिक (रा. सुबराव गवळी, तालीम मंडळ, मंगळवार पेठ), ऋषभ सुनील भालकर (२१, जनाई दत्तनगर, कळंबा), पुष्कराज मुकुंद यादव (२०, रा. लक्ष्मी कॉलनी, शिंगणापूर), युनूस हसन मुजावर, धीरज व पार्थ  यांचा समावेश आहे.

यादवनगरातील मटका अड्ड्यावरील छाप्यावेळी पोलिसांनाच झालेल्या मारहाणीनंतर संघटित गुन्हेगारी, अवैध धंद्याविरोधात जिल्हा पोलिस दलाने आक्रमक पावले उचलली आहेत. पोलिसांनी संशयित मटका अड्डामालक संशयित सलीम मुल्ला, माजी उपमहापौर शमा मुल्लासह त्यांच्या साथीदारांवर राजारामपुरी पोलिसांनी मोकाअंतर्गत कारवाई केली. हा प्रकार ताजाच असताना किरवे (ता. गगनबावडा)  येथील रणजित पाटील यांनी खासगी सावकार साखरे व महाडिक यांच्याकडून १० लाख रुपयांचे कर्ज २० टक्‍क्‍यांनी घेतले. त्यातील पाच लाखांची रक्कम परतफेड केली. उर्वरित कर्जाच्या वसुलीसाठी साखरे, महाडिकसह त्याच्या साथीदारांनी पाटील यांचे अपहरण केले. डांबून घालून पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांना बेदम मारहाण केली. जमीन नावावर करून घेण्याचा प्रयत्न करून २५ लाखांची खंडणीची मागणी केली. याबाबत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादेनंतर साखरे, महाडिकसह सात जणांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत त्यातील साखरे, भालकर, यादवला अटक झाली आहे. अद्याप अभी महाडिक, मुजावर, धीरज व पार्थ यांचा शोध सुरू आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी खासगी सावकारी मोडून काढण्यासाठी आवश्‍यक ती कारवाई करा, संशयित सावकारांच्या घरांची झडती घ्या, असे आदेश नुकतेच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला दिले. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी साखरे, महाडिक टोळीवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची कुंडली काढली. यात या टोळीविरोधात वर्चस्व वादातून खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, गर्दी-मारामारी, जाळपोळ असे गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले. त्यानुसार जाधव यांनी या एसएस गॅंगविरोधात मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठवला. त्यांनी तो विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. वारके यांच्यांकडे पाठविला.

श्री. वारके यांनी त्यास मंजुरी दिली. साखरे, महाडिक गॅंगकडून खासगी सावकारीच्या व्यवहारांना दिवाणी स्वरूप देऊन त्याआधारे मिळकती, जागा खंडणी स्वरूपात किंवा भय दाखवून गिळंकृत केल्या असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांच्या चक्रात अडकलेल्यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा किंवा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेडे करीत आहेत. 

संशयियांचा गोव्यात शोध
गुन्हा दाखल झाल्यापासून अद्याप पसार झालेला संशयित अभी महाडिकसह युनूस मुजावर, धीरज व पार्थ यांचा जुना राजवाडा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र पथकांकडून शोधमोहीम घेतली जात आहे. यातील काही संशयित गोवा येथे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांच्या शोधासाठी एक पथक गोवा येथे पाठविण्यात आले आहे. अटक केलेल्या तिघा संशयितांकडे चौकशी सुरू असून, उद्या (ता.१३) पोलिस कोठडी संपणार असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

वर्षभरातील नववी कारवाई
संघटित गुन्हेगारीविरोधात मोकाअंतर्गत जिल्ह्यातील या वर्षातील ही नववी कारवाई ठरली. आतापर्यंत ७७ संघटित संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com