गर्भवतीचा डॉक्‍टरकडून विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

कोल्हापूर - गर्भवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी साईक्‍स एक्‍स्टेंशन येथील डॉक्‍टरवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ. संतोष वाघुले असे संशयिताचे नाव आहे.

कोल्हापूर - गर्भवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी साईक्‍स एक्‍स्टेंशन येथील डॉक्‍टरवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ. संतोष वाघुले असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - डॉ. वाघुले याचे शाहूपुरी साईक्‍स एक्‍स्टेंशन येथे डायग्नेस्टिक सेंटर आहे. तेथे नातेवाइकांबरोबर गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी गेली होती. दुसऱ्या सोनोग्राफीसाठी ती महिला १९ नोव्हेंबरला सेंटरमध्ये गेली. त्या वेळीही तिच्याबरोबर नातेवाईक होते. सोनोग्राफी करताना डॉ. वाघुलेने तिच्याशी गैरवर्तन केले. याबाबत महिलेला शंका आली. त्यांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा केली, मात्र हा उपचाराचाच भाग असल्याचे सांगून त्याने वेळ मारून नेली.

याबाबत संबंधित महिलेने महिला नातेवाईकांकडून माहिती घेतली. त्या वेळी त्या महिलेला आपल्याशी डॉक्‍टरने गैरवर्तन केल्याचे लक्षात आले. तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. तसे संतप्त नातेवाईकांनी १९ डिसेंबरला डॉक्‍टरला जाब विचारला. यानंतर घरच्यांकडून २१ डिसेंबरला डॉ. वाघुलेविरोधात तक्रार अर्ज शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिला होता, असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आज दुपारी महिलेचा जबाब नोंदवून डॉ. वाघुलेवर कलम ३५४ (अ) अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, याबाबत फिर्याद दाखल करण्यास विलंब होत असल्याचे प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या लक्षात आले. त्यांच्यासह शिवसेनेचे हर्षल सुर्वे, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी याचा पाठपुरावा केला. प्रजासत्ताक संस्थेतर्फे पोलिस महासंचालक, केंद्रीय व राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेत काल (ता. २४) रात्री पोलिस महासंचालकांनी याबाबतची मेलद्वारे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे विचारणा केली. त्यानुसार आज अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या आदेशानुसार दुपारी फिर्याद दाखल करून डॉ. वाघुलेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Molestation of a pregnant by doctor