आई, बाबा मतदान करायचं हं ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मतदार जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्‍का वाढावा, यासाठी विद्यार्थ्यांमार्फत पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र पाठविण्याचा उपक्रम प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत केला जाणार आहे. त्याद्वारे सव्वापाच लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभाग घेतील.
-राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा. 

सातारा : "येत्या 21 ऑक्‍टोबरला विधानसभा निवडणुकीत मतदान करा, आई-बाबा आमचा एवढा हट्ट पुरवा व न चुकता मतदान करा,' असे आवाहन पहिली ते बारावीपर्यंतचे तब्बल पाच लाख विद्यार्थी आपल्या पालकांना करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम सर्व शाळांमध्ये गुरुवारी (ता.26) राबविला जाणार आहे. 

लोकसभा निवडणुकांना मतदानाची टक्‍केवारी कमी असते. त्यावेळी विद्यार्थ्यांमार्फत मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालकांना पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविला होता. तसेच मतदानाची प्रक्रियेची माहिती व्हावी, स्वच्छतेची माहिती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी स्वच्छता मतदान ही प्रक्रियाही जिल्हा परिषदेने राबविली होती. त्या धर्तीवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती केली जाणार आहे. 

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून "येत्या 21 ऑक्‍टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करावे, आई-बाबा आमचा एवढा हट्ट पुरवा व न चुकता मतदान करा', असे आवाहन करावे, यासाठी हा उपक्रम राबविला जाईल. 
 

दहा लाख मतदारांपर्यंत... 

जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतचे पाच लाख सहा हजार विद्यार्थी असून, ते आई-वडील तसेच घरातील मतदारांना उद्देशून हे पत्र लिहिणार आहेत. त्यामुळे तब्बल दहा लाखांवर मतदारांपर्यंत ही जनजागृती मोहीम पोचणार आहे. प्रत्येक शाळास्तरावर एका सर्वोत्कृष्ट पत्राची झेरॉक्‍स पत्र जतन करून ठेवली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mom, Dad, please vote !