अन्‌.. निवृत्त सहायक फौजदाराचे परत मिळाले वीस हजार! 

परशुराम कोकणे 
रविवार, 29 एप्रिल 2018

दिल्लीहून बॅंकेतून बोलतोय असे सांगून माझ्या एटीएम कार्डची माहिती घेतली. मुलींनी दोन-तीन वेळा फोन केला. सुरवातीला मी नाही म्हणून टाळले. नंतर मात्र खरेच बॅंकेतून फोन आला असेल म्हणून माहिती दिली. ओटीपी दिल्यानंतर माझ्या खात्यावरील पैसे काढल्याचा एसएमएस आला. सायबर पोलिसांत तक्रार केल्यानंतर माझे पैसे परत मिळाले. नागरिकांनी अशाप्रकारच्या फोनवर विश्‍वास ठेवू नये. 
- श्रीधर भोसले, निवृत्त सहायक फौजदार

सोलापूर : बॅंकेतून बोलतोय असे सांगून आपल्या बॅंक खात्याची माहिती, एटीएम कार्डचा क्रमांक, ओटीपी क्रमांक विचारून गंडविल्याच्या घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत. कुर्डुवाडीतील एका निवृत्त सहायक फौजदाराला काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने गंडविण्यात आले, पण त्यांनी तत्काळ सोलापूर ग्रामीण सायबर पोलिसांशी संपर्क करून तक्रार नोंदविली. सायबर पोलिसांनीही तत्काळ हालचाल करून निवृत्त पोलिसाला वीस हजार रुपये परत मिळवून दिले. 

कुर्डुवाडी येथील श्रीधर दत्तात्रय भोसले हे निवृत्त सहायक फौजदार आहेत. त्यांना 5 एप्रिल रोजी एका महिलेचा फोन आला. फोनवर गोड आवाजात बोलणाऱ्या महिलेने श्री. भोसले पेन्शनची रक्कम जमा करायची असे सांगून एटीएम कार्ड नंबरची विचारणा केली. तुमच्या सुरवातीला श्री. भोसले यांनी माहिती देणे टाळले. दोन-तीन वेळा फोन आल्यानंतर त्यांनी त्यांचा एटीएम क्रमांक सांगितला. त्यानंतर ओटीपी क्रमांकही सांगितला. हा फोन बनावट असल्याचा अंदाज श्री. भोसले यांना आला. पण तोवर त्यांच्या खात्यातून वीस हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आले होते. त्यांनी तत्काळ कुर्डुवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर सोलापूर ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याकडे हे प्रकरण आले. सायबर पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तत्काळ आवश्‍यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली. श्री. भोसले यांच्या खात्याची माहिती घेऊन अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन खरेदी केल्याचे पोलिसांनी फोनपे कंपनीला कळविले. त्यानुसार पुढील प्रक्रिया करून श्री. भोसले यांची सर्व म्हणजेच वीस हजारांची रक्कम परत मिळवून देण्यात आली. 

सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या सूचनेनंतर पोलिस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार पावले, व्यंकटेश मोरे, योगेश नरळे, रवी हाटखिळे, मनीष पवार, अन्वर अत्तार तत्काळ हालचाल करून श्री. भोसले यांचे वीस हजार रुपये परत मिळवून दिले. 

इथे करा तक्रार.. 
शहर सायबर पोलिस ठाणे : 0217-2744616 
ग्रामीण सायबर पोलिस ठाणे : 0217-2317131 

नागरिकांनी आपल्या एटीएम कार्डची माहिती कोणालाही देवू नये. मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांकही कोणाला सांगू नये. कोणतीही बॅंक आपल्या खात्याची माहिती फोनवरून घेत नाही. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क राहावे. जर आपल्यासोबत ऑनलाइन पद्धतीने फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. 
- रवींद्र गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 

दिल्लीहून बॅंकेतून बोलतोय असे सांगून माझ्या एटीएम कार्डची माहिती घेतली. मुलींनी दोन-तीन वेळा फोन केला. सुरवातीला मी नाही म्हणून टाळले. नंतर मात्र खरेच बॅंकेतून फोन आला असेल म्हणून माहिती दिली. ओटीपी दिल्यानंतर माझ्या खात्यावरील पैसे काढल्याचा एसएमएस आला. सायबर पोलिसांत तक्रार केल्यानंतर माझे पैसे परत मिळाले. नागरिकांनी अशाप्रकारच्या फोनवर विश्‍वास ठेवू नये. 
- श्रीधर भोसले, निवृत्त सहायक फौजदार

Web Title: money return to police in Solapur