‘व्हाईट कॉलर’आडून सावकारी जोमात

‘व्हाईट कॉलर’आडून सावकारी जोमात

कोल्हापूर - व्हाईट कॉलर म्हणून रुबाब मारायचा आणि दरमहा दहा टक्‍क्‍यांनी खासगी सावकारी करायची. अंगलट आले, की मिटवामिटवी करायची. ही नवी पद्धत आता शहरात रुजू लागली आहे. तक्रार नाही, म्हणून पोलिसही काहीच कारवाई करत नाहीत. प्रत्यक्षात पैसे घेणारा आणि देणाराही अब्रू जाईल म्हणून घाबरतो. यातूनच खासगी सावकारी जोर धरू लागली आहे. पुढारीपणाच्या आडून सावकारी जोमात आली आहे. नुकतीच एका व्यावसायिकाने आत्महत्या केली; मात्र त्याचे ओपन सिक्रेट आजही ठाण्याच्या डायरीपर्यंत पोचले नाही.

खरे व्हाइट कॉलर गुलदस्त्यात
शहरातील एका खासगी सावकाराच्या प्रकरणातील गुपित एका चिठ्ठीत अडकले आहे. त्याने ही चिठ्ठी त्याच्या पत्नीकडे दिल्याचे संदर्भ पुढे आले आहेत. प्रत्यक्षात पोलिस ठाण्यापर्यंत यातील काहीच पोचले नाही; मात्र विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या राजकारणातील एकजण, शहरातील प्रमुख मार्गावरील एक व्यावसायिक, शेजारील ग्रामीण भागातील एक व्यक्ती यांच्याकडून दहा टक्‍क्‍यांनी कर्ज घेतल्याची माहिती पुढे येत आहे. 

अखेरचा निर्णय..
खासगी सावकाराने एका व्यावसायिकाची मोटार काही दिवसांपूर्वी काढून घेतली होती. फ्लॅट लिहून घेतला होता. आता राहते घर घेण्याची तयारी सुरू होती. म्हणून त्याने शेवटचा निर्णय घेतल्याचे उदाहरण ताजे आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठीही मोठ्या किमतीवर पाणी सोडण्यासाठी संबंधितांनी तयारी दाखविल्याचेही बोलले जाते. व्हाइट कॉलर गुन्हेगार असल्यामुळे त्यांनी मिटवामिटवीत जोर लावल्याचीही माहिती पुढे आली आहे.

घटना १ 
साहेब, तुमचे दहा टक्‍क्‍यांनी घेतलेले पैसे द्यायला आम्ही नाही म्हणत नाही; पण धंदाच कमी झाला आहे. फ्लॅट विकले जात नाहीत. थोडे दिवस थांबा, अशी गयावया करणारा कर्जदार आणि ‘तुम्ही मिळवा, आम्हाला चुना लावा’, अशा शब्दांत खासगी सावकाराची दमदाटी सुरू असलेला व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हॉटस्‌ ॲपवरून व्हायरल झाला होता. एका कट्ट्यावर बसून शहराच्या मध्यवर्ती हा संवाद सुरू होता. शहरातील एका पक्षाशी संबंधित व्यक्ती त्यामध्ये दिसत होती. पुढे याचे काहीच झाले नाही. ना तक्रार नोंद झाली, ना व्हाईट कॉलर सावकार सर्वांसमोर आला. गाजला फक्त व्हिडिओ.

घटना २ 
खासगी सावकारी करीत असलेल्या महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचारी महिलेला व्याजाने पैसे दिले. नऊ लाखांपर्यंत हा आकडा गेला. तीन लाख घेतल्याचे सांगण्यात येत होते. संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्या महापालिकेतील खासगी सावकाराला अटक झाली. पोलिस कोठडीही मिळाली. 

घटना ३ 
एका व्यावसायिकाला दहा टक्‍क्‍यांनी पैसे दिले. त्याने त्याची परतफेड करूनही त्याच्याकडे तगादा लावला होता. त्याने थेट कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची नोंद डायरीपर्यंत आली; पण कारण वेगळे होते. यावेळी संबंधित सावकार एका पक्षाच्या नेत्याच्या जवळचा होता. फुटबॉल खेळाडूचे नाव सांगून तो सर्वांना धमकावत होता. यंत्रणेतील एकाचेही नाव तो वारंवार सांगत होता. हे प्रकरणही पुढे आलेच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com