दहा वर्षांत यंदा मॉन्सूनचा रुसवा

विशाल पाटील
सोमवार, 24 जून 2019

मॉन्सून आले रे आला... म्हणेपर्यंत ‘लांडगा आला रे आला’ गोष्टीप्रमाणे पावसाची अवस्था झाली आहे. गत दहा वर्षांत मॉन्सूनचे आगमन सर्वाधिक लांबले असून, प्रारंभीचा पाऊसही कमी पडला आहे. गतवर्षी दुष्काळाचे चटके संपूर्ण जिल्ह्याने सोसले असतानाच यावर्षीही पाऊस लांबणीवर पडल्यामुळे सर्वदूर भीतीचे ढग दाटले आहेत.

सातारा - मॉन्सून आले रे आला... म्हणेपर्यंत ‘लांडगा आला रे आला’ गोष्टीप्रमाणे पावसाची अवस्था झाली आहे. गत दहा वर्षांत मॉन्सूनचे आगमन सर्वाधिक लांबले असून, प्रारंभीचा पाऊसही कमी पडला आहे. गतवर्षी दुष्काळाचे चटके संपूर्ण जिल्ह्याने सोसले असतानाच यावर्षीही पाऊस लांबणीवर पडल्यामुळे सर्वदूर भीतीचे ढग दाटले आहेत.

मॉन्सूनचे वारे वाहू लागल्यानंतर सर्वत्र आनंदही पसरत असतो. पावसाचे आगमन शेतकऱ्यांपासून सर्वांसाठी दिलासादायक ठरते. यंदा मात्र मॉन्सून दाखल होऊनही बरसत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरीही हवालदिल झाले आहेत. गतवर्षी दुष्काळी स्थिती भयावह बनल्यामुळे जिल्ह्यातील कोयनासह सर्वच धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे दुष्काळी माण, खटाव यासह पश्‍चिमेकडील भागातही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची चिन्हे दाट आहेत. अशातच मॉन्सून दाखल होवूनही बरसत नसल्यामुळे चिंतेचे ढग दाटून आले आहेत. 

शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडल्या आहेत. उशिरा पेरण्या झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले होते. तेव्हा ता. २१ जूनपर्यंत जिल्ह्यात अवघा ६९.९ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. त्यावेळी जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती उद्‌भवली होती. तसेच २०१४ मध्येही अवघा ६९.३ मिलिमीटर पाऊस झालेला होता. 

यंदा तर त्यापेक्षाही कमी पाऊस ता. २१ जूनपर्यंत झाला आहे. शिवाय, अवकाळी, पूर्व मॉन्सून पावसानेही पाठ फिरवली आहे. मॉन्सूनचा हा रुसवा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. एकीकडे धरणांतील पाणीसाठा तळाला गेला असताना पाऊस लांबल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. शिवाय, दुष्काळी भागात टॅंकरची संख्याही वाढली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Rain Environment