
कोल्हापूर - यंदा मॉन्सूनचे आगमन लांबल्याने पश्चिम महाराष्ट्रातही पावसाला नेहमीपेक्षा उशिराच सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. याचा विचार करता मॉन्सूनचे माणसाने बनवलेले वेळापत्रक बिघडल्याचे हवामानशास्त्रज्ज्ञांचे मत आहे, असे असले तरी मॉन्सून आपली सरासरी पूर्ण करणार आहे
कोल्हापूर - यंदा मॉन्सूनचे आगमन लांबल्याने पश्चिम महाराष्ट्रातही पावसाला नेहमीपेक्षा उशिराच सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. याचा विचार करता मॉन्सूनचे माणसाने बनवलेले वेळापत्रक बिघडल्याचे हवामानशास्त्रज्ज्ञांचे मत आहे, असे असले तरी मॉन्सून आपली सरासरी पूर्ण करणार आहे, येत्या १९ ते २५ जुलै या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामानशास्त्रज्ञांनी दिली.
मॉन्सूनच्या आगमनाबद्दलची चर्चा मेच्या शेवटापासूनच सुरू होते. यंदा मॉन्सून वेळेत, पूर्णक्षमतेने अशा आशयाची माहिती हवामानखात्याकडून दिली जाते. ७ जून ही ठरलेली तारीख आहे. यंदा मात्र मॉन्सूनने बराचकाळ प्रतीक्षा करायला लावली. जिल्ह्यात २० जूनला मॉन्सूनचे आगमन झाले. कोकणातही मॉन्सूनचे आगमन उशिराच झाले. याचे प्रमुख कारण होते, ते म्हणजे मेच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टी आणि गुजरातच्या किनाऱ्यावर सायक्लॉन वादळ येऊन धडकले होते. याचा परिणाम मॉन्सूनच्या गतीवर झाला.
केरळमध्ये सात दिवस उशिरा मॉन्सून आला. त्यामुळे यंदा मॉन्सूनचे वेळापत्रक बिघडले. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. त्यामुळे लहान धरणे ५० ते ६० टक्के तर मोठी धरणे ४० टक्क्यांपर्यंत भरली, मात्र तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. याबद्दल पुणे
वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यप म्हणाले, ‘‘सध्या बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तसेच अरबी समुद्रातही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर आवश्यक त्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या पुढे सरकण्याला गती मिळणार आहे. आमच्या अंदाजानुसार १९ ते २५ जुलै या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे जोरदार पाऊस पडेल. या कालावधीत पाऊस आपली सरासरी ५० टक्यांपर्यंत पूर्ण करेल. त्यानंतरही पाऊस चांगला पडेल. जागतिक तपमानवाढ, वृक्षतोड, वाढते शहरीकरण, कमी होणारी जंगले या सर्वाचाच परिणाम मॉन्सूनच्या आगमनावर होत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे केलेल्या निरीक्षणानंतर अंदाज चुकत आहेत. पावसाचे प्रमाणही कमी-अधिक होत आहे.
मॉन्सूनचे आगमन ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्टी आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. मात्र पर्यावर्णातील वाढता मानवी हस्तक्षेप, बेसुमार जंगल तोड, वाढती तापमानवाढ या सर्व घटकांचा मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम होतो. ही एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे. हा इशारा वेळीच समजला पाहिजे.
- जय सामंत, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ.
मॉन्सूनचे वेळापत्रक हे वर्षानुवर्षे केलेल्या निरीक्षणातून तज्ज्ञांनी बनवले आहे. त्याप्रमाणे मॉन्सूनच्या प्रवासाचा अंदाज वर्तवला जातो. मात्र, मॉन्सूनच्या प्रवासादरम्यान होणाऱ्या अनेक नैसर्गिक घटकांचा परिणाम त्यावर होतो. त्यामुळे त्याच्या आगमनाची वेळ पुढे-मागे होते. दहा वर्षांपासून मान्सूनचे आगमन लांबत आहे.
- अनुपम कश्यप,
पुणे वेधशाळेचे प्रमुख