video : मोरया चिंचोरे, हिवरेबाजार प्रेरणा केंद्र ः चपळगावकर 

Moraya Chinchore, Hivarebazar Inspiration Center Chapalgaonkar says
Moraya Chinchore, Hivarebazar Inspiration Center Chapalgaonkar says

नगर : ""आजच्या जागतिकीकरणाच्या काळात खेडी जिवंत राहणे गरजेचे आहे. त्या पार्श्‍वभूमीवर युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाने ग्रामविकासासाठी भरीव काम केलंय. प्रतिष्ठानाने विकसित केलेले मोरया चिंचोरे व पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार ही गावं आशेची किरणं आहेत,'' असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले.

सोनईत झाले वितरण
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे कृतज्ञता पुरस्कार आज सायंकाळी सोनई (ता. नेवासे) येथे पी. डी. पाटील व नरेंद्र चपळगावकर यांना प्रदान करण्यात आले. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती चपळगावकर बोलत होते.

पोपेरे व पवारांचा सन्मान

ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे यांचा यशवंतराव गडाख यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

फादर दिब्रिटो यांचाही गौरव

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला होता. तथापि, प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. 

सन्मानामागेही प्रेम, जिव्हाळा

चपळगावकर म्हणाले, ""सन्मानामागे कामाबरोबरच प्रेमही असते. सत्तेचा माज चढल्यावर वाङ्‌मयाला तुच्छ मानलं जातं, हे आम्ही सातत्याने अनुभवलं आहे. खेडी स्वायत्त झाली तरच भारताचा आवाज जगाच्या केंद्रस्थानी जाईल, असे महात्मा गांधी यांना वाटायचे. मात्र, दुर्दैवाने आज खेडी दुहीची झाली आहेत. खेड्यांच्या तुलनेत सुविधांचा अभाव असल्याने सध्या शहरांकडे ओढा आहे. त्यामुळे खेडी ओस पडू लागली आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर मोरया चिंचोरे व हिवरेबाजार यांसारखी गावं प्रेरणा देणारी केंद्रे ठरत आहेत. यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत पाटील गडाख व त्यांची टीम वेगळ्या वाटेने जात आहेत, ही समाधानाची बाब आहे.'' 

पाटलांकडून गडाख पाटलांची स्तुती

डॉ. पाटील यांनी यशवंतराव गडाख यांच्या साहित्य व राजकारणातील वाटचालीची मुक्तकंठाने स्तुती केली. गडाख यांनी लिहिलेली पुस्तके वाचली तरी, जीवन कसे जगावे याची प्रेरणा मिळू शकते, असे ते म्हणाले. डी. वाय. पाटील समूहाच्या पुढाकाराने पुण्यात सुरू असलेल्या शैक्षणिक व वैद्यकीय वाटचालीचा आढावाही त्यांनी घेतला.

गावागावांत बीजबँक व्हावी

पोपेरे यांनी आपल्या खास शैलीत देशी बियाण्यांचे महत्त्व पटवून दिले. घरोघरी "बीजबॅंक' व्हावी व संकरित बियाण्यांना तिलांजली देऊन जुन्या बियाण्यांचा पुरस्कार करावा, असे आवाहन त्यांनी केले. महिला व मुलींना अत्याधुनिक जीवनशैलीबरोबरच जुन्या रूढी व परंपरा जपण्याच्या टिप्सही त्यांनी दिल्या. त्यांच्या भाषणाला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

गडाख पाटील हे रोल मॉडेल

पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारामध्ये केलेल्या ग्रामविकासाची माहिती देत, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे आपले "रोल मॉडेल' असल्याचे सांगितले. प्रशांत पाटील गडाख व त्यांचे सहकारी हिवरेबाजारच्या वाटेने मार्गक्रमण करत असल्याने, भविष्यात नेवासे तालुक्‍यात मोरया चिंचोरे गावानंतर अजून दहा गावे आदर्श होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठबळावर राज्यातील किमान शंभर गावे आदर्श करण्याचा चंग आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीने बांधला असल्याचे ते म्हणाले. डॉ. सुभाष देवढे यांनी सूत्रसंचालन केले. 

"त्यांना' समाजासमोर "प्रेझेंट' करतो 
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी प्रास्ताविकात "यशवंत'च्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांतील कर्तबगार मंडळींचा शोध घेऊन त्यांना कृतज्ञता पुरस्काराच्या माध्यमातून समाजासमोर "प्रेझेंट' करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. त्यातून विविध घटकांतील मंडळींना प्रेरणा मिळते. परिणामी, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांत झोकून देऊन काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुरस्काराचे हे यश असल्याचे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com