ताकारी, टेंभूच्या पाण्यासाठी सोमवारी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

आटपाडी - टेंभू आणि ताकारी योजना तत्काळ सुरू करून दुष्काळी भागाला पाणी द्यावे, यासाठी २८ ऑगस्ट रोजी सांगलीत वारणाली येथील पाटबंधारे विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

आटपाडी - टेंभू आणि ताकारी योजना तत्काळ सुरू करून दुष्काळी भागाला पाणी द्यावे, यासाठी २८ ऑगस्ट रोजी सांगलीत वारणाली येथील पाटबंधारे विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

थकीत पाणीपट्टीमुळे टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजना बंद ठेवली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातून आटपाडी, सांगोला तालुक्‍यातून अगोदर पाणीपट्टी घेऊन पाणी सोडले जात आहे. केवळ कारखानदारांची थकबाकी असल्यामुळे योजना बंद ठेवल्याचा दुष्काळी भागाला फटका बसला आहे. जिल्ह्यात एकीकडे पूरस्थिती निर्माण झाली असताना पूर्व भाग दुष्काळात होरपळत आहे. पिण्याचे पाणी आणि चारा टंचाईचे संकट ओढवले आहे. अनेक गावांतून टॅंकरची मागणी वाढत आहे, असे मते यावेळी मांडण्यात आली. 

डॉ. पाटणकर व श्री. पाटील यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी साखर कारखानदार बिलातून कपात करून घेतात. ते पैसे तात्काळ भरून योजना सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

ते म्हणाले,‘‘थकबाकी भरलीच पाहिजे. पण दुसऱ्याच्या थकबाकीपोटी नियमित पैसे भरणाऱ्या दुष्काळी भागाचे पाणी बंद करणे योग्य नाही. योजना बंद ठेवून पैसे भरणाऱ्या दुष्काळग्रस्तांवर अन्याय केल्यासारखे आहे. पूर्व भागात यावर्षी कसलाही पाऊस झाला नाही. परिस्थिती बिकट आहे. टॅंकरची मागणी वाढत असून चाऱ्याचे संकट ओढवणार आहे. अशावेळी चाऱ्याची सोय करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. भरमसाठ खर्च येतो. त्याऐवजी उपसा सिंचन योजना सुरू करून दुष्काळी भागाला आधार द्यावा, अशी मागणी आहे. योजना सुरू करण्यासाठी सोमवार (ता. २८) क्रांतीसिह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी अकरा वाजता पाटबंधारे विभागावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’’

Web Title: Morcha for Takari Tembhu Water